‘क्रांतिकारकांचे मुकुटमणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथाने अनेक पिढय़ांना प्रेरणा दिली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या ग्रंथापासून प्रेरणा घेऊन अनेक सशस्त्र क्रांतिकारक तयार झाले. स्वत: स्वातंत्र्यवीरांच्या लेखणीतून सिद्ध झालेल्या या ग्रंथाच्या मूळ हस्तलिखिताची प्रत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाने जतन करून ठेवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यसमराची सुरुवात १० मे १८५७ रोजी झाली होती. स्वातंत्र्यसमराच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अलीकडेच सावरकर स्मारकात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सावरकर यांच्या हस्ताक्षरातील या ग्रंथाची मूळ प्रत सावरकरभक्त आणि नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली.ज्वालामुखी, स्फोट, अग्निकल्लोळ आणि तात्पुरती शांतता अशा चार भागात असलेल्या या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ब्रिटिशांनी ‘शिपायांचे बंड’ ठरविलेल्या या बंडाला सावरकरांनी ते ‘शिपायांचे बंड’ नव्हे तर स्वातंत्र्यसमर असल्याचे या ग्रंथाद्वारे सिद्ध केले. लंडन येथे असताना सावरकर यांनी १९०८ मध्ये हा ग्रंथ लिहिला. तेथेच त्याचा इंग्रजी अनुवादही झाला होता. पण ब्रिटिशांनी प्रकाशनापूर्वीच या ग्रंथावर बंदी आणली होती. सावरकरांचे हे मूळ हस्तलिखित मादाम कामा यांनी ‘अभिनव भारत’चे सदस्य डॉ. कुटिन्हो यांच्याकडे सुपुर्द केले. डॉ. कुटिन्हो यांनी ते सांभाळले आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी ते सावरकरांकडे पाठविले. त्यानंतर १९५० मध्ये मराठीत हा ग्रंथ प्रकाशित झाला, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
मराठी ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वी या ग्रंथाचा इंग्रजी, जर्मन या परदेशी आणि तामिळ, बंगाली आदी भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला होता. सावरकर यांच्या हस्ताक्षरातील ही मूळ प्रत पुढे सावरकर स्मारकाकडे आली. लॅमिनेट करून या हस्तलिखिताचे जतन करण्यात आले असून सावरकर स्मारकातर्फे उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयात ते ठेवण्यात येणार असल्याचेही रणजित सावरकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Original copy of 1857 freedoam fight
First published on: 16-05-2014 at 01:11 IST