गणरायाच्या जयजयकाराने सोमवारी गणेशचतुर्थीला अवघा आसमंत दुमदुमून निघेल. पण छोटय़ा पडद्यावर मात्र बाप्पांचे आगमन आधीच झाले असून आपल्या आवडत्या मालिकांच्या सेटवर कलाकार बाप्पांची सेवा करण्यात मग्न झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपणही रोजच्या प्रमाणे टीव्हीवर मालिका बघता बघता त्यांच्याबरोबर गणपतीच्या पूजेत किंवा आरतीत सामील होणारच आहोत. मात्र दैनंदिन मालिकांमध्ये काम करणारा या हिंदी-मराठी कलाकारांपैकी अनेकजण बाप्पांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या बाप्पांबद्दलच्या भावना काय आहेत, ते स्वत: बाप्पांची पूजा करतात का याविषयी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी..

संगीता घोष ऊर्फ सांची  
मला गणेशोत्सव खूप आवडतो. यादरम्यान वातावरण खरोखरच खूप छान असते. गणेशोत्सवाच्या दरम्यान माझे काही जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य आपल्या घरी गणपती आणतात. या निमित्ताने मी त्यांच्या घरी जाते आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेते. श्री सिद्धिविनायकावर माझा खूप विश्वास आहे आणि जेव्हा कधी मला शूटिंगमधून सुट्टी मिळते, संधी मिळताच मी मंदिरमध्ये जाण्याचा प्रयत्न करते. मला मोदक खायला आवडतात. यावेळी गणेशोत्सवाकरिता आतापर्यंत तरी मी काही योजना आखलेली नाही; कारण, मी कदाचित शूटिंगमध्ये व्यस्त असेन.

रुसलन मुमताज ऊर्फ ध्रुव
गेल्या आठ ८ वर्षांपासून आम्ही घराच्या गॅरेजमध्ये गणपतीची स्थापना करीत आहोत. माझी आई संपूर्ण मंदिर सजविते आणि मी संध्याकाळी पूजा करतो. दरवर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान मी सिद्धिविनायक मंदिरामध्येही आवर्जून जातो. एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना, नवा उपक्रम सुरू करताना अथवा एखादी मोठी वस्तू खरेदी करताना मी गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरमध्ये जातो.

डेल्नाझ इराणी ऊर्फ दिलशाद  
मी गणपती बाप्पांची खूप मोठी भक्त आहे. मला गणेशोत्सव खूप आवडतो. दरवर्षी मी सिद्धिविनायक मंदिरात जाते आणि बाप्पांचा आशीर्वाद घेते. माझे काही जवळचे मित्र आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करतात आणि मी त्यांच्या घरी बाप्पांचे दर्शन घ्यायला जाते. यंदा गणेशोत्सवात शूटिंगमध्ये व्यग्र आहे. पण, मी सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

सुलभा देशपांडे ऊर्फ दादी
गणपतीवर माझी नितांत श्रद्धा आहे. मी नेहमीच सर्वाना सुखी ठेवण्याची प्रार्थना गणपतीजवळ करते. मी जेव्हा तरुण होते, त्यावेळी आम्ही आमच्या घरी गणपती बसवत होतो. ते दिवस खरोखरच खूप आनंददायक होते. घराची साफसफाई करणे, गणेशोत्सवाकरिता सजावट करणे, मोदक बनविणे आणि गणपतीची आरती म्हणणे, सर्व काही खूपच छान वाटायचे. सगळीकडे मंगलमय वातावरण असते. माझ्या सासरी माझा दीर गणेशमूर्तीची स्थापना करतो. मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी मला भेट म्हणून दिलेल्या गणपती बाप्पाच्या एकूण ५० मूर्ती माझ्याकडे आहेत. दरवर्षी मला फार आतुरतेने गणेशोत्सवाची प्रतीक्षा असते.रश्मी अनपट (ईश्वरी)
बुद्धिदाता गणराया चरणी माझे लाख लाख प्रणाम. आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची मीच नव्हे तर अवघा महाराष्ट्र अगदी आतुरतेने वाट बघत असतो. बाप्पा येतील आणि सगळ्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी देतील हेच मागणे मागतो. पण आज समाजामध्ये काही विपरीत घटना घडत आहेत, मुलींवर अत्याचार होत आहेत, अशा अनेक संकटांपासून आम्हाला मुक्त कर आणि सगळ्यांना सुबुद्धी दे हेच मागणे. बापाचा आशीर्वाद असाच आमच्यावर सदैव राहू दे, सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आंचल मुंजाल ऊर्फ पिहू
गणेशोत्सव हा माझा आवडता उत्सव. ज्या दिवशी मी माझे स्वत:चे घर खरेदी करेन, त्यावेळी घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निश्चय केला होता. पण, माझी आई यासाठी तयार नव्हती. तिने सांगितले, जर एकदा गणपतीला घरी आणला तर दरवर्षी बाप्पांची पूजा करावी लागेल आणि माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे मला मला ते जमणे शक्य नाही याची मला पूर्ण जाणीव होती. म्हणून माझ्या घरच्या गणपतीची दररोज सकाळी नित्यनेमाने मी पूजा करते. माझ्या सर्व जवळच्या मित्रमंडळींकडे गणपती येतो. म्हणूनच, मी तेथे जाते आणि आरती व विसर्जन सोहळ्यात सहभागी होते. दरवर्षी मी व माझी आई लालबागला जाण्याचा विचार करतो, परंतु आतापर्यंत हे शक्य झालेले नाही. माझी मनोकामना यावर्षी तरी बाप्पा पूर्ण करतील  असे मला वाटते.

चांदनी ऊर्फ अमिता
लहानपणी आम्ही आपल्या घरी गणपती आणत होतो. तो खरोखरच उत्कृष्ट काळ होता आणि घरी मंगलमय वातावरण असायचे. मी मिठाई बनविण्यामध्ये, घराची साफसफाई करण्यामध्ये, आईची आणि सजावटीमध्ये डॅडची मदत करत असे. आम्ही एक आठवडा आधीपासूनच तयारीला लागायचो. आता मी काम करायला सुरुवात केली आहे आणि त्याबरोबरच मी शिक्षणही घेत आहे. म्हणूनच मला वेळ मिळत नाही. पण, मला त्या दिवसांची खूप आठवण येते. तो खूपच आनंददायी काळ होता. यावेळी गणेश चतुर्थीकरिता माझी कोणतीही योजना नाही. मी कदाचित माझ्या कुटुंबासोबत गणेशोत्सव साजरा करेन.
राजश्री ठाकूर
गणेशोत्सव मला खूप आवडतो. दरवर्षी मी घरी दीड दिवसाचा गणपती बसवते. माझ्या आईच्या घरी सात दिवस गणपतीची मनोभावे पूजा केली जाते आणि मी स्वत: सर्व तयारी करते. माझ्यासाठी गणपती उत्सव म्हणजे कुटुंबाशी भेटीगाठी, मिठाई वाटणे आणि घरी राहून भरपूर मस्ती-धमाल करणे, हे आहे.

आश्का गोराडिया
हिंदू संस्कृतीमध्ये गणपती खरोखरंच एक खास उत्सव आहे. या उत्सवाच्या निमित्ताने मित्रमंडळी-नातेवाईकांच्या भेटीगाठीचा योग जुळून येतो. बाप्पाची मनोभावे सेवा करण्याची संधीही मिळते.

शिवाजी साटम ऊर्फ एसीपी
मी आपल्या कुटुंबासोबत गणेशोत्सव साजरा करतो. मी मुंबईमध्ये आपल्या घरी मूर्ती आणत नाही. माझ्या गावी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. माझी गणपतीवर अपार श्रद्धा आहे आणि त्याच्याच आशीर्वादाने मी खूप आनंदात आहे. दरवर्षी गणेशोत्सवाचे दहा दिवस माझ्यासाठी खूपच खास असतात. यावर्षी माझी कोणतीही योजना नाही, कारण मी शूटिंगमध्ये व्यस्त असेन. पण, गणेशोत्सवात गावातील वातावरण खूपच छान असते. त्यामुळे संधी मिळाल्यास मी माझ्या गावी जाईन.

हरीश दुधाडे
गणपती.. कलेचे आराध्य दैवत.. त्यामुळे आपसूकच गणपती कलाकाराचे आराध्य दैवत आहे असे मला वाटते. माझी कलाक्षेत्रातील खरी सुरुवात गणपतीपासूनच झाली. कारण आमच्या येथील गणेशोत्सवात मी एकपात्री प्रयोग सादर करायचो. या १० दिवसांत गणेशाच्या रूपात मला माझा अगदी जवळचा मित्र घरी आल्यासारखा वाटतो. गणपती बाप्पा माझा आई-बाबा, कलेसाठी माझा गुरू सगळं काही आहे.