ग्राहकांना लुबाडणारा, कामगारांना त्रास देऊन त्यांच्यावर अन्याय करणारा, स्वत:ची पोतडी भरणारा अशीच उद्योजकाची प्रतिमा तयार केली जाते. उद्योजक हा देशाचा कणा असून हजारो उद्योजक तयार होण्यासाठी उद्योजकाला साहित्यिकांनी खलनायक म्हणून नव्हे तर नायक म्हणून समाजापुढे आणावे, असे नागपुरातील विको कंपनीचे उद्योजक गजानन पेंढारकर सत्कार कार्यक्रमप्रसंगी म्हणाले.
 सायंटिफिक सभागृहात पद्मगंधा प्रतिष्ठानच्यावतीने नलिनी बाळकृष्ण देवपुजारी ‘जीवन गौरव’ पुरस्काराने गजानन पेंढारकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध उद्योजक विश्राम जामदार कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे होते.
 तसेच महापौर अनिल सोले, पोरवाल कॉलेजचे प्राचार्य डॉ. कुमार शास्त्री, पद्मगंधा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी भडभड, नलिनी देवपुजारी, शकुं तला पेंढारकर आदी उपस्थित होते.
जगात वाईट काहीही नसून समाजाला चांगले घडविणाऱ्या माणसांची गरज आहे. तसेच चिकाटी, काम करण्याची जिद्द, महत्त्वाकांक्षा, शिवाय धोका स्वीकारण्याची तयारी असेल तर व्यक्तीला प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
उद्योग क्षेत्रात आल्यावर जवळपास ३० वर्षे त्यांनी शासनाशी संघर्ष करावा लागला. त्या संघर्षांतून शिकत गेलो आणि त्यातून यशाचे टप्पे गाठले. आपल्या जीवनातील कटूगोड अनुभवांचे दाखले देत उद्योजकांनी यशाचा डोंगर कसा उभा करावा याची त्यांनी विस्तृत माहिती दिली.
कुठेच काही जमत नाही म्हणून उद्योग करायचा ही मानसिकता मराठी माणसांनी सोडण्याची गरज आहे, असे उद्घाटनपर भाषणात विश्राम जामदार यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य कुमार शास्त्री, डॉ. पंकज चांदे, यांनी आपापली मते मांडली. शुभांगी भडभडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
लक्ष्मीची वेशभूषा परिधान केलेल्या ऐश्वर्या महाजन हिच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात गजानन पेंढारकर यांच्यावर पुष्पवर्षांव करण्यात आला. मानवरांच्या हस्ते शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रभा देऊसकर यांनी संचालन केले तर स्मृती देशपांडे यांनी आभार मानले.