पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला परवापासून (शनिवार) सुरू होणार आहे. तपपूर्तीकडे वाटचाल करणारी ही व्याख्यानमाला दि. १४ पर्यंत चालणार असून या काळात अनेक मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी लोकांना मिळेल, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र विखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
व्याख्यानमालेचे उद्घाटन पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या ‘प्रबोधनाची आवश्यकता’ या व्याख्यानाने होणार असून, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यावेळी उपस्थित राहणार आहेत. दि. ९ ला सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्यां वर्षां देशपांडे यांचे (स्त्री-भ्रुण हत्या), दि. १० ला संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यू. म. पठाण (संत साहित्य व अंधश्रद्धा),  दि. ११ ला ज्येष्ठ विचारवंत प्रा. अरुण घोडके (शिवरायांचे आठवावे रूप), दि. १२ ला डॉ. भालचंद्र कांगो (एफडीआयचा कृषी क्षेत्रावर होणार परिणाम), दि. १३ ला कृषिरत्न आनंद कोठाडिया (कृषिक्षेत्र आणि ग्रामीण विकास) दि. १४ ला प्रा. डॉ. प्रकाश पाठक (युवकांपुढील आव्हाने) यांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेची सांगता होईल. माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दररोज संध्याकाळी सायंकाळी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात ही व्याख्याने होणार आहेत.