जगप्रसिद्ध सतारवादक पं. रविशंकर यांच्या निधनाचे वृत्त येताच औरंगाबादेत २० वर्षांपूर्वी वेरूळ महोत्सवात त्यांनी सादर केलेल्या सतारवादनाच्या आठवणी संगीतप्रेमींच्या मनात दाटून आल्या. वेरूळ लेणी महोत्सवात पं. रविशंकर यांनी प्रसिद्ध तबलावादक पं. कुमार बोस यांच्यासह यमन रागात सादर केलेली मैफल आजही चांगली स्मरणात असल्याच्या आठवणी या निमित्ताने जागा झाल्या.
मराठवाडय़ातील एकमेव मैफलीत पं. रविशंकर यांनी सतारीला पोषक विस्तार यमन रागात आपल्या शैलीत उलगडून दाखवला होता. सन १९९२ च्या मार्च महिन्यात रंगलेली ही मैफल व यात सामील झालेल्या संगीतप्रेमींनी पंडितजींच्या जाण्यामुळे जवळचे काही हरवून गेल्याची भावना व्यक्त केली.
संगीतकार विश्वनाथ ओक – पं. रविशंकर हे भारतीय संगीत क्षेत्रातील एक सृजनशील पर्व, संगीताचा उद्गाता काळाच्या पडद्याआड. जितके मोठे सतारवादक, तितकेच महान संगीत रचनाकार होते. सुरुवातीला आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांनी संगीताचे अनेक प्रयोग केले. साठच्या दशकात जॉर्ज हॅरिसन, यहुदी मेनूहीन यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कलावंतांसह फ्यूजन संगीताचे अनेक लक्षवेधी प्रयोग पं. रविशंकर यांनी केले. रविशंकर यांच्यामुळेच भारतीय संगीताची उच्च परंपरा जगात लोकप्रिय झाली. परदेशातील संगीत रसिक भारतीय संगीताकडे आकर्षित झाले. अनेक रागांची निर्मिती करून भारतीय शास्त्रीय संगीतात मोलाची भर टाकण्याचे मोलाचे कार्य रविशंकर यांनी केले.
पं. नाथ नेरळकर – ‘१२-१२-१२’ चा असा दुर्मिळ योग पं. रविशंकर यांच्याबाबत साधला जावा, ही दुर्दैवाची बाब. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात त्यांचे भरभरून योगदान होते. भारतीय संगीत किती श्रेष्ठ आहे ते त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले. स्वत: उत्कृष्ट सतारवादक तर होतेच, शिवाय भारतीय संगीताची खरी व शाश्वत ओळख जगाला घडविणारे मोठे कलाकार होते. सवाई गंधर्व मैफलीमध्ये त्यांची कला प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य लाभले. अनेक रागांची निर्मिती त्यांनी केली. यातील ‘परमेश्वरी’ हा राग तर अद्वितीय ठरला. या एका रागावर अनेक नव्या कलाकारांनी आवडीने आपली कला सादर केली.
राजेंद्र परोपकारी (संचालक, तालविद्या केंद्र) – सांगीतिक ऊर्जेचा सूर्य असेच पंडितजींचे कार्य. भारतासह जगातील अनेक संगीत पद्धतींमधून पंडितजींचे संगीत लीलया श्रोत्यांसमोर आले. भारतीय संगीताला वैश्विक पातळीवर उंची देण्याचे कार्य त्यांचे थोरले बंधू पं. उदयशंकर यांनी केले. हेच कार्य व्यापक प्रमाणात पं. रविशंकर यांनी तब्बल ७५ वर्षे केले. छोटेखानी सभागृह ते स्टेडियम अशा सर्व ठिकाणी श्रोत्यांना आपल्या तेजस्वी कलेने झपाटून टाकणारा महान कलाकार आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. अतिशय प्रसन्न मुद्रा, सळसळता उत्साह, विलोभनीय हास्य अशा सुदर्शन व्यक्तिमत्त्वाचे ते धनी होते. शुद्ध आलाप व जोड यामध्ये अतिखर्ज ते तार सप्तकात गंभीरपणे राग सादर केल्यानंतर ताल-लयीच्या खेळात विस्मयकारक लयकारी व तिहाया यांचा मनस्वी आनंद श्रोत्यांना त्यांनी भरभरून दिला.
ज्येष्ठ संगीतज्ञ चित्रलेखा देशमुख – संगीत क्षेत्रातील मोठा शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला. सतारीसारखे वाद्य परदेशात प्रसिद्ध व प्रचलित करण्याचे त्यांचे श्रेय सर्वमान्य आहे. सुरुवातीला या प्रयत्नाला अनेकांनी हिणवले. परंतु पंडितजी डगमगले नाहीत. उलट कठीण स्थितीतही त्यांनी सतारवादनाची कला फुलवली, मोठी केली. इतकी की आज सर्व जगभर त्याचा दरवळ पसरला आहे. वेरूळ महोत्सवात त्यांची कला प्रत्यक्ष ऐकता आली. पुण्यात विद्यार्थिदशेच्या काळात सवाई गंधर्व महोत्सवात अनेकदा त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. या सर्व आठवणींची शिदोरी कधीही न संपणारी आहे.
प्रा. हेमा उपासनी – पडद्याआड असलेली सतारकला पंडितजींनी देश-विदेशात नेली. त्यांचे हे योगदान खूप मोठे आहे. गेली कित्येक तपे त्यांनी केलेली संगीतसाधना अनेक पिढय़ा घडविण्यास पूरक ठरली. संगीत साधनेबरोबरच संगीताचा प्रसार व प्रचाराचे त्यांचे कार्य अनमोल ठरले. सतारीची कला किती दिमाखदार आहे ते सप्रयोग त्यांनी जगभर दाखवून दिले. त्यांची ही तपश्चर्या जवळून पाहण्याची, ऐकण्याची संधी मिळाली हे आपले भाग्यच.