मनसेचा बुधवारचा रास्ता रोको पनवेल परिसरात पोलिसांनी होऊच दिला नाही. मंगळवारी सायंकाळ ते बुधवारी सकाळपर्यंत मनसेच्या ९४ कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. ठिकठिकाणी पोलिसांनी सक्रिय मनसैनिकांना प्रतिबंधात्मक अटक केल्यामुळे पनवेलमध्ये होणारा रास्ता रोको पूर्णत: बारगळला. दररोज शीव-पनवेल मार्गावरील धावणारी वाहतूक आज मनसेच्या आंदोलनामुळे तुरळक प्रमाणात सुरू होती. या आंदोलनाला काही प्रमाणात वाहतूकदार संघटनांनी पाठिंबा दिल्याने रस्त्यावर काही अंशी शुकशुकाट होता.
कळंबोली मॅकडोनाल्ड येथे मनसे रास्ता रोको करणार असल्याची माहिती पोलिसांना अगोदर मिळाली होती. मंगळवारी कोन टोल प्लाझा फोडल्यामुळे पोलिसांनी धरपकडीचे हत्यार उपसले. कार्यकर्तेच पोलिसांच्या ताब्यात असल्याने कोणतेही आंदोलन अथवा अनुचित घटना पनवेल परिसरात घडली नाही.
शीव-पनवेल महामार्गावर ४५० पोलीस, डॉक्टर, अग्निशमन दलाचे बंब तसेच जवानांचा फौजफाटा, एनएमएमटीच्या बसगाडय़ा हे घेऊन पोलीस उपायुक्त संजय ऐनापुरे हे बंदोबस्तासाठी तैनात होते. कामोठे परिसरात १५ जणांना दुकाने बंद करीत असताना आणि कळंबोली शहरात मनसेच्या २७ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. मंगळवारी रात्री पनवेल आणि उरण मधील ५२ जणांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली होती. उरण येथील दास्तान आणि पनवेल येथील कोन टोल फोडल्यामुळे टोलनाक्यांची सुरक्षा वाढविली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel mns toll agitation
First published on: 13-02-2014 at 12:51 IST