धुळे येथे सुमारे ३० वर्षांपूर्वी घडलेल्या एका सत्यघटनेचा आधार घेत तयार करण्यात आलेला ‘पाशबंध’ हा चित्रपट २२ मे रोजी धुळ्यात प्रदर्शित होत असून या चित्रपटासाठी धुळ्यासह नाशिकच्या कलाकार व तंत्रज्ञांनी योगदान दिले असल्याची माहिती दिग्दर्शक आनंदराम यांनी येथे दिली.
एकविसाव्या शतकात महिला सक्षमीकरणाचा कितीही नारा दिला तरी आपल्या सभोवताली महिलांचे खच्चीकरण, त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष सुरू आहे. धुळ्यातील एका सामान्य महिलेने जगण्यासाठी केलेले दोन हात.. तिला आप्तांची वाटणारी ओढ यावर भाष्य करणारा गशिश फिल्म्स निर्मित ‘पाशबंध’ चित्रपटाचा विशेष शो नाशिककरांसाठी ठेवण्यात आला आहे. कलाकार, तंत्रज्ञ उत्तर महाराष्ट्रातील असल्याने उत्तर महाराष्ट्रही आता मराठी चित्रपटनिर्मितीत पुढे येऊ लागला असल्याचे आनंदराम यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.
स्वाभिमानी सुनंदा आणि तिच्या कौटुंबिक संघर्षांवर चित्रपट आधारित आहे. सुनंदाचे आपल्या पती व कुटुंबावर प्रेम असते. परंतु एका क्षणी पतीचा रंगेलपणा लक्षात आल्यानंतर ती तडक माहेरी येते. परंतु मुलाच्या ओढीने ती पुन्हा सासरी येते. सुनंदा त्या वेळी गरोदर असते. तिच्या चारित्र्यावर संशय घेत पती तिला घरातून हाकलून देतो. अशा वेळी माहेर आणि सासर यांपैकी कोणताही आधार न घेता ती स्वतंत्रपणे राहण्यास सुरुवात करते.
तिला मुलगी होते. तिच्या संगोपनात मग्न असलेल्या सुनंदाला घरच्यांची आस असते. परंतु शेवटपर्यंत तिला नेण्यास कोणीच येत नाही, अशी चित्रपटाची कथा आहे. चित्रपटातील नायिका नंदिता धुरी यांनी चित्रपट धुळ्यात झाला असला तरी अहिराणीचा वापर न करता तो मराठीत तयार झाला असल्याचे स्पष्ट केले.
चित्रपटातून शोकांतिका मांडण्यात आली आहे. प्रत्येकाच्या मनात सुनंदाचे पुढे काय झाले, याविषयी कुतूहल राहील, असेही त्या म्हणाल्या. चित्रपटाला आनंद ओक यांनी संगीत दिले असून सुरेश घायवट यांची गीते आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pashbandh marathi movie
First published on: 30-04-2015 at 07:58 IST