मोबाईल टॉवरची दुरूस्ती करण्याच्या नावाखाली सोसायटीत घुसून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचे िबग त्या कंपनीचा अधिकारी ऐनवेळी तिथे आल्याने फुटले. वादावादी, झटापटी व पलायन असे नाटय़ झाल्यानंतर पाचपैकी दोन जण नागरिकांच्या तावडीत सापडले. त्यांना भरपूर ‘प्रसाद’ दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी दापोडीत ही घटना घडली.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकराच्या सुमारास दापोडीतील सोनाई विहार या सोसायटीतील मोबाईल टॉवरची दुरूस्ती करण्याच्या नावाखाली पाच युवक आले. त्यांच्याकडे बोगस ओळखपत्रे होती. त्यापैकी तीन जण तिसऱ्या मजल्यावरील टॉवरवर चढले व दोन जण खाली थांबून देखरेख करत होते. थोडय़ा वेळाने टॉवर ज्या कंपनीचे आहे, त्याचाच अभियंता तेथे पाहणीसाठी आला. तेथे कटावणीने काहीतरी कापण्याचे उद्योग सुरू असल्याचे पाहून त्याने या तरूणांना हटकले. तेव्हा तू कोण, अशी विचारणा त्यांनी केली. तर, अभियंत्याने आपली ओळख सांगून ‘तुम्ही कोण’ असा जाब विचारला. आपले पितळ उघडे पडल्याचे लक्षात आल्याने तेथून पोबारा करण्याचा प्रयत्न तरूणांनी केला. तेव्हा अभियंता व त्यांच्यात झटापटी झाली. तीन जणांनी मिळून त्याचे पाय पकडले व वरून खाली टाकण्याचा प्रयत्न करत असताना अभियंत्याने आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूचे नागरिक जमा झाले. खाली थांबलेल्या दोन जणांसह अन्य एक असे तिघे पळून गेले. उर्वरित दोन युवक नागरिकांच्या तावडीत सापडले. नागरिकांनी त्यांना पोलिसांच्या हवाली केले. उशिरापर्यंत पोलिसांची कार्यवाही सुरू होती.