‘मुंबईला गेलात, तर समुद्र आवर्जून बघायचाच,’ अशी तंबी पहिलीवहिली मुंबईची वारी करणाऱ्या प्रत्येक माणसाला मिळतेच. गेट वे ऑफ इंडियापासून सुरुवात करून मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सी-फेस जुहू चौपाटी ते थेट आक्सा बीच असा मोठाच्या मोठा समुद्रकिनारा मुंबईला मिळाला आहे. संध्याकाळी चौपाटीवर छान भेळपुरी खात डुबत्या सूर्याला निरोप देणे हा कित्येक मुंबईकरांचा सुट्टीच्या दिवशी ठरलेला उपक्रम आहे. असे असूनही मुंबईचा एक समुद्रकिनारा मात्र अजूनही उपेक्षितच राहिला आहे. दादरसारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेली दादर चौपाटी सध्या स्वच्छता, साफसफाईच्या अभावी कचरा, दरुगधी, भटकी कुत्री आणि चोरांचे माहेरघर बनू लागले आहे.
दादर म्हणजे मुंबईकरांसाठी मध्यवर्ती ठिकाण. सुट्टीच्या दिवशी भाज्यांपासून ते अगदी सणासुदीला कपडे, सजावटीचे सामान घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मुंबईकर दादर गाठतात. सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्यासाठीसुद्धा शिवाजी पार्क, दादर चौपाटी, सिद्धिविनायक या ठिकाणी आवर्जून येतात. एरवी निर्जन असणारी दादरची चौपाटी मुंबईतील इतर चौपाटय़ांप्रमाणेच सुट्टीच्या दिवशी लोकांनी गजबजून जाते. लहान मुलांची वाळूचे किल्ले बनविण्याची शर्यत, गोळेवाल्याचे ठेले, पाणी उडवत ऐटीत धावणारे टांगे यांच्यामुळे चौपाटीला जीव येतो. पण असे असूनही या चौपाटीवर एक नजर टाकल्यास घाण, कचरा, निर्माल्य यांची लांबच लांब रांग लागलेली दिसते. चौपाटीवर येताना आपल्यासोबत आणलेल्या खाऊच्या पिशव्या, फेरीवाल्यांच्या प्लॅस्टिकच्या प्लेट्स, चमचे हे सर्व कचराकुंडीमध्ये टाकण्यापेक्षा लोक सर्रास चौपाटीवर इतरत्र फेकून देतात. निर्माल्यासाठीही वेगळी कुंडी दिली असूनही ते पाण्यात टाकण्यात लोक धन्यता मानतात. हा कचरा नंतर पाण्यासोबत परत किनाऱ्यावर येतो. या कचऱ्यातील खरकटं, उरलंसुरलं शोधण्यासाठी त्यावर कावळे, कुत्रे, डास यांचा वावर कायमच असतो. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीसुद्धा लोक चौपाटीवर फिरायला येत असले, तरी त्यांची या कचऱ्यापासून सुटका नसते. या सर्व प्रकारांमुळे सुट्टीचे दिवस वगळता इतर दिवशी या चौपाटीवर कोणीही येण्यास धजावत नाही. त्यामुळे एरवी प्रेमीयुगुले, त्यांना लुटण्यासाठी आलेले भुरटे चोर, जुगार खेळणारे गुंड यांचा वावर चौपाटीवर असतो.मुंबईतील इतर चौपाटय़ांवर येणारे पर्यटक लक्षात घेऊन त्यांची नियमितपणे साफसफाई करण्यात येते. जुहू, मरिन ड्राइव्हसारख्या परिसरही गजबजलेला असूनही स्वच्छ असतो. पण दादर चौपाटी मात्र कायम घाणीने भरलेली असते. गणपती विसर्जनानंतर किंवा एनसीसीच्या उपक्रमानिमित्त कॉलेजमधील मुले काही सामाजिक संस्था कधी तरी येथे स्वच्छता मोहिमा राबवितात. विशेष म्हणजे या चौपाटीला लागूनच महापौर निवास आहे, पण तरीही पालिकेचे या चौपाटीकडे दुर्लक्ष होते. एरवी दादरला ‘बालेकिल्ला’ म्हणणारेही याकडे सहजपणे दुर्लक्ष करतात. भविष्यात या चौपाटीच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहिल्यास चौपाटीची शान परत मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People are not using the dustbins on chaupaties
First published on: 19-05-2015 at 06:17 IST