जमाव काबूत आणण्यासाठीचे पोलिसांचे मैदानावरील प्रात्यक्षिक आज रस्त्यावरच्या नागरिकांच्या त्रासास कारणीभूत झाले. अश्रूधुराच्या नळकांडय़ा जास्त फोडल्या गेल्यामुळे मैदानातून हा धूर बाहेर पडला व रस्त्यावरच्या नागरिकांना त्याचा त्रास होऊन काय झाले म्हणून सगळे चक्रावून गेले.
पोलीस मुख्यालयात सध्या नवोदित पोलिसांसाठी दंगल काबूत आणण्याचे, तसेच अन्य प्रात्यक्षिके सुरू आहेत. सायंकाळी साधारण चारच्या सुमारास ही प्रात्यक्षिके होतात. आज ती थोडी उशिरा म्हणजे साडेपाचनंतर सुरू झाली. दंगलीत जमाव काबूत आणण्यासाठी कायकाय उपाय करायचे हा आजचा विषय होता. त्यात काही पोलिसांकडून अश्रूधुराच्या जादा नळकांडय़ा फोडल्या गेल्या. सायंकाळची वेळ, वारा दुपारपासून गायब झालेला, वातावरण थंड झालेले, त्यामुळे नेहमीप्रमाणे अश्रूधूर वर जाण्याऐवजी मैदानात जमिनीलगत फिरत राहिला. नंतर हळूहळू बाहेर पडला. रस्त्यावर थोडी मोकळी हवा लागताच तो थेट दिल्लीगेटपर्यंत पसरला. थोडय़ाच वेळात त्याने आपला प्रताप दाखवायला सुरूवात केली. पायी चालणाऱ्यांचे, वाहनावरच्यांचे, रस्त्यावर थांबलेल्यांचे डोळे चुरचुरू लागले. त्यातून पाणी येऊ लागले. वाहन चालवता येणे अवघड झाले.
एकाच वेळी अनेकांना हा त्रास होऊ लागल्याने गडबड उडाली. धूर कसला आहे, कुठून आला याची चर्चा सुरू झाली. काहींनी लगेचच तोफखाना पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान, धूर पोलीस मुख्यालयाच्या मैदानातून येत असल्याचे लक्षात आले. पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे तेवढय़ात तिथे आले. त्यांनी मुख्यालयात जाऊन पाहणी केली असता प्रात्यक्षिकासाठी म्हणून अश्रुधूराच्या नळकांडय़ा फोडल्या असल्याचे आढळले. तांबे यांनीच नंतर थेट दिल्ली दरवाजा रस्त्यापासून ते तोफखाना पोलीस ठाण्यापर्यंतच्या त्रास होत असणाऱ्या प्रत्येकाला काय झाले आहे ते पोलिसांच्या मदतीने सांगण्यास सुरूवात केली.
पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आलेल्या दूरध्वनीवरही त्यांनी विस्ताराने माहिती सांगत घाबरून जाऊ नये असे आवाहन केले. दरम्यानच्या काळात धुराची तीव्रता ओसरली व परिस्थिती पूर्ववत झाली.