महापालिकेच्या शहर बस वाहतुकीची रखडलेली दरवाढ अखेर प्रादेशिक प्राधिकरणाच्या जिल्हा समितीकडून मंजूर झाली. दि. २१ जानेवारीपासून ही दरवाढ लागू केली जाईल. यात सध्याच्या दरापेक्षा किमान १ रूपया जास्त दर द्यावा लागणार आहे.
दरवाढीला मंजुरी मिळाल्यामुळे आता सेवा बंद करणार असलेली ठेकेदार कंपनीने मनपाला दिलेली नोटीस अर्थातच मागे घेतली जाणार आहे. मात्र दरवाढ झाली तरीही बेशिस्त वाहतुकीची, दमदाटी करणाऱ्या काही रिक्षा व्यावसायिकांची समस्या आहेच. त्यांना आळा बसावा म्हणून मनपाने जिल्हा प्रशासन व वाहतूक शाखा यांच्यावर दबाव टाकण्यासाठी शहर बस सेवेला मदत करावी, संयुक्त प्रयत्न करावेत ही मागणी कायम असल्याचे प्रसन्न पर्पल मोबॅलिटी या ठेकेदार कंपनीचे
स्थानिक व्यवस्थापक दिपक कपूर यांनी
सांगितले. कंपनी त्यासाठी आग्रही आहे असे ते म्हणाले.
शहर बस सेवेच्या एकूण २३ गाडया असून त्यांच्या दिवसभरात तब्बल ५५० फेऱ्या होतात. एक गाडी किमान २०० किलोमीटर अंतर रोज धावते. काही मार्ग फायद्यात आहेत तर काही फार मोठय़ा तोटय़ात आहेत. त्यामुळे ना नफा ना तोटा याच तत्वावर आतापर्यंत ही सेवा सुरू असून त्यातूनच इंधनाचे दर वाढले की लगेचच दरवाढ करावी लागते अन्यथा तोटा होण्यास सुरूवात होते अशी माहिती कपूर यांनी दिली. रोज साधारण १३ ते १४ हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेतात व त्यातही महिला तसेच युवतींची संख्या जास्त आहे, त्याचे कारण सुरक्षित प्रवास हेच आहे असे कपूर यांनी सांगितले.
शहराच्या मध्यवर्ती भाग ते सावेडी, निर्मलनगर या मार्गाला सर्वाधिक प्रवासी आहेत. सकाळी बरोबर साडेसहा वाजता सर्व गाडय़ा सुरू होतात व रात्री साडेनऊला बंद होतात. स्मार्ट कार्ड ही विशेष योजना शहर बस सेवेने सुरू केली आहे. यात सुरूवातीला २२५ रूपये जमा करून कार्ड घेता येते. या कार्डावर २४० रूपयेपर्यंतचा प्रवास करता येतो. नंतर हेच कार्ड फक्त २०० रूपयांत रिचार्ज करून मिळते, त्यावरही २४० रूपयांचा प्रवास करता येतो. कार्ड ट्रान्सफरेबल आहे तसेच एकाच वेळी खर्च करता येतो व जपूनही वापरता येते. फक्त विद्यार्थीच नाही तर सर्वसामान्य प्रवाशांनाही त्याचा चांगला फायदा असूनही कार्डला विशेष प्रतिसाद मिळालेला नाही असे कपूर म्हणाले.
बस सेवेचे बदललेले दर याप्रमाणे
किलोमीटर, सध्याचा दर व बदललेला दर या क्रमाने- ० ते ४ किमी. ६ ऐवजी ७ रूपये, ४ ते ६ किमी. ७ ऐवजी ८. ६ ते ८ किमी. ८ ऐवजी ९. ८ ते १० किमी. १० ऐवजी ११. १० ते १२ किमी. ११ ऐवजी १३. १२ ते १४ किमी. १३ ऐवजी १५. १४ ते १६ किमी. १४ ऐवजी १६. १६ ते १८ किमी. १६ ऐवजी १८. १८ ते २० किमी. १८ ऐवजी २१. २० ते २२ किमी. २१ ऐवजी २४ रूपये. बस सेवेचा सर्वाधिक म्हणजे २० किलोमीटर लांबीचा मार्ग शाहूनगर केडगाव ते विखे अभियांत्रिकी महाविद्यालय हा असून त्यासाठीचा २४ रूपये असा आहे.