शहरातील सर्व हॉटेल ३१ डिसेंबरला रात्री दीडपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी आयोजित ‘थर्टी फर्स्ट’च्या पाटर्य़ा रात्री दीडपर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत.
नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला रात्री शहरात विविध ठिकाणी दरवर्षी जंगी पाटर्य़ाचे आयोजन करण्यात येते. मध्यरात्रीनंतरही मोठय़ा जल्लोषात या पाटर्य़ा सुरू असतात. काही वर्षांपूर्वी या पाटर्य़ाना व हॉटेलला पहाटेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आलीकडच्या काळात शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता ‘थर्टी फर्स्ट’च्या पाटर्य़ावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार रात्रीचा कालावधी कमी करण्यात आला आहे. यंदा रात्री दीडपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे.
शहराची सुरक्षितता लक्षात घेता ३१ डिसेंबरला दुपारपासून शहरभर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता, पुणे कॅम्प आदी भागामध्ये प्रामुख्याने पोलिसांचे लक्ष राहणार आहे. सुमारे आठ हजार पोलीस कर्मचारी या बंदोबस्तासाठी नेमण्यात येणार आहेत. एक जानेवारीला सकाळपर्यंत हा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मद्यधुंद होऊन वाहन चालविणाऱ्यांबाबतही कठोर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. नववर्षांचे स्वागत करताना कारवाई टाळण्यासाठी मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.