स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सोळाव्या दीक्षान्त समारंभास राज्यपाल तथा कुलपती के. शंकरनारायणन यांची उपस्थिती, याच समारंभात पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांना डी. लिट. ही मानद पदवी बहाल करण्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या मांदियाळीसमोर विद्यापीठ प्रशासनाने ‘गोंधळात गोंधळ’चा प्रयोग नेटकेपणाने सादर केला.
मागील सुमारे महिनाभरापासून या समारंभाची लगबग सुरू होती. त्यातच चाकूरकर यांनी विद्यापीठाची डी. लिट. स्वीकारण्यास येण्याचे मान्य केल्याने यंदाच्या समारंभाला मोठे वलय प्राप्त झाले होते. चाकूरकरांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीस मानद पदवी प्रदान करण्यास तोलामोलाची व्यक्ती हवी, म्हणून कुलगुरूंनी कुलपतींना निमंत्रण दिले. ते त्यांनी स्वीकारलेही; पण शुक्रवारच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणाऱ्या कुलपतींनी या समारंभात भाषण केले नाही. आपण भाषण करणार नाही, असे त्यांनी अगोदरच कळविले होते. उच्च शिक्षण खात्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री डी. पी. सावंत समारंभाचे सन्माननीय पाहुणे होते; पण कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना विद्यापीठ प्रशासनाने त्यांनाही भाषणाची संधी दिली नाही.
चाकूरकर गेली ५ दशके सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. विद्यापीठाने डी. लिट. देऊन त्यांचा सन्मान करण्याचे ठरवले, तेव्हा शैक्षणिक क्षेत्रात या निर्णयाचे स्वागत झाले. चाकूरकर माजी केंद्रीय गृहमंत्री आहेत. हेच पद भूषविलेल्या शंकरराव चव्हाण यांचाही याच विद्यापीठाने डी. लिट. देऊन सन्मान केला होता. दीक्षान्त समारंभातला रटाळपणा टाळण्यासाठी मोजक्याच पीएच. डी.धारकांना मंचावर पदवी प्रदान करण्यात आली. पण संपूर्ण कार्यक्रमात चाकूरकरांबद्दल एकही गौरवपर भाषण झाले नाही. दीक्षान्त समारंभातला मुख्य भाग म्हणजे गुणी विद्यार्थ्यांना पदक बहाल करणे. तो पार पाडताना गलथान नियोजनामुळे ‘गोंधळात गोंधळ’ चालला होता. एकाचे पदक दुसऱ्याला हा प्रकार पदवीदान होतानाही सुरू होता.
कुलपतींच्या हस्ते चाकूरकर यांना डी. लिट. प्रदान झाल्यानंतर मंडपातले उपस्थित शांत असल्याचे पाहिल्यानंतर कुलपतींनीच ‘आता टाळ्या वाजवा’ असे आवाहन केले. त्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या. चाकूरकरांचा परिचय, तसेच मानपत्र वाचनाची जबाबदारी प्रा. अजय टेंगसे यांनी पार पाडली. संपूर्ण कार्यक्रमात तोच भाग सफाईदारपणे पार पडला. चाकूरकर यांचे दीक्षान्त भाषण झाले. भाषणात त्यांनी डी. लिट. दिल्याबद्दल कुलगुरू व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. तत्पूर्वी स्वामी रामानंद तीर्थ, शंकरराव चव्हाण यांचे स्मरण केले. या विद्यापीठात जे काही घडेल त्यातून भारताची लोकशाही व एकात्मता बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Perplexity in swaratim degree distribution programm in nanded
First published on: 18-01-2014 at 01:58 IST