शालेय मुलांचे अपहरण व अपहरणाचे प्रयत्न केल्याच्या वाढत्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर तणावाखाली वावरणाऱ्या येथील संतप्त नागरिकांचा राग आता निरपराध्यांवरही निघू लागला आहे. किल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री मुले पळविणारा समजून एका दूध विक्रेत्यास आणि मंगळवारी सकाळी संगमेश्वरमध्ये कपडे धुण्याची पावडर विकणाऱ्यास नागरिकांकडून बेदम मारहाण झाली. दुसरीकडे आझादनगर भागात आणखी एका मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात शालेय मुलांचे अपहरण व अपहरणाचे प्रयत्न झाल्याच्या घटना घडत असल्यामुळे पालक व विद्यार्थी हादरले आहेत. नाशिक शहरात पंधरवाडय़ात तीन ते चार मुले गायब होण्याचे प्रकार झाले आहेत. मालेगावमध्येही अशा घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे धास्तावलेले अनेक पालक पाल्यांना सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडू देण्यास मज्जाव करतांना दिसून येत आहेत. परिणामी सायंकाळचे खासगी शिकवणी वर्ग आणि विविध खेळांच्या सरावासाठी मैदानांवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत आहे.
शाळांच्या उपस्थितीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर परिसरात दिसणाऱ्या अनोळखी व्यक्तीकडे संशयास्पद नजरेने पाहिले जाऊ लागले आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद असल्याचा जराही समज झाला तरी लोक अशा व्यक्तींना मुले पळविणारी व्यक्ती समजून रट्टे देऊ लागले आहेत. काही निरपराध्यांना लोकांच्या संतापाचा प्रसाद मिळाला आहे.
सोमवारी रात्री नऊच्या सुमारास सुरेश आत्माराम पवार हा सौंदाणे येथील युवक दुचाकीवरून आपल्या मित्रांसोबत मातामठ तालीम भागातून जात असताना त्याच्या दूचाकीचा एका लहान मुलीला किरकोळ धक्का लागला.
लगेच तेथे गर्दी जमा झाली. मुलीला पळवून नेण्याचा हा प्रयत्न असल्याचा गैरसमज गर्दीत पसरला. त्यातून या लोकांनी सुरेशला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. नंतर सुरेश हा दूध विक्रेता असल्याचे निष्पन्न झाले. या मारहाणीत सुरेश मात्र जखमी झाला असून त्याला रूग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. किल्ला पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या एका घटनेत मोतीबाग नाका परिसरात सायकलवर फिरून कपडे धुण्याच्या पावडरची विक्री करणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीला मुले पळविणारा समजून लोकांनी मारहाण करण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. दरम्यान, शहरातील आझाद नगरातील मोहंमद अफजल या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार सोमवारी पोलिसात दाखल करण्यात आली आहे. त्याचे काका मोहंमद खालीफ यांनी ही तक्रार दिली आहे.

More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Person beaten by crowd due to misunderstanding
First published on: 26-11-2014 at 08:19 IST