यशवंतराव चव्हाण यांच्या कर्तृत्वाला त्यागाचा सुगंध होता. सत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसाचे कल्याण करण्यासाठीच असतो, अशी त्यांची ठाम धारणा होती. त्याग, सेवा, बुद्धिमत्ता, प्रतिभा, कर्तृत्व अशा सर्व गुणांचा मिलाफ यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अमृतकुंभ होय, असे प्रतिपादन प्राचार्य यशवंत पाटणे यांनी केले.
चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने येथील बी. रघुनाथ सभागृहात आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत पाटणे यांचे भाषण झाले. अध्यक्षस्थानी महापौर प्रताप देशमुख होते. शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या वंदना फुटाणे यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. पाटणे म्हणाले, की कोणत्याही व्यक्तीची उंची केवळ त्याने गाठलेल्या शिखराच्या मोजमापावरून करता कामा नये. ती व्यक्ती कोणत्या वातावरणातून आली नि कोणत्या परिस्थितीत जन्म घेऊन त्याने कर्तृत्वाचे शिखर गाठले, यावरूनच ही उंची मोजली जावी. त्यादृष्टीने यशवंतराव चव्हाण यांची उंची निश्चितच लाखमोलाची होती. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या यशवंतरावांनी देशप्रेम व सामाजिक बांधिलकीचा वसा आपल्या आईकडून घेतला. विद्यार्थिदशेत ब्रिटिश सत्तेविरुद्ध केलेल्या एका आंदोलनात माफी मागितली असती तर त्यांची सुटका होऊ शकणार होती. मात्र, आपल्या मुलाने कोणताही गुन्हा केला नाही, अशा वेळी त्याने माफी मागता कामा नये, असे बाणेदार उत्तर यशवंतरावांच्या मातेने दिले. हा विचारांचा संस्कार पुढे यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनला.
महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा वारसा जपताना महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचा वारसा यशवंतरावांनी कृतीत आणला. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकता यावे, यासाठी त्यांनी ‘ईबीसी’ सवलतीचा धरलेला आग्रह इतका क्रांतिकारी आहे की ही सवलत नसती तर आज ग्रामीण भागातल्या अनेक पिढय़ा निरक्षर राहिल्या असत्या. आयुष्याच्या उत्तरार्धात एकाकी जीवन जगलेल्या यशवंतरावांची ‘बँक शिल्लक’ केवळ ३६ हजार रुपये होती, यावरून त्यांचे आयुष्य किती निष्कलंक होते याची कल्पना येते, असे पाटणे म्हणाले.
महापौर देशमुख यांनी शहरात सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. सत्कारमूर्ती फुटाणे यांनी झरी येथील शाळेत लोकसहभागातून राबविलेले विविध उपक्रम या वेळी विशद केले. सूत्रसंचालन प्रा. भीमराव खाडे यांनी केले. पाटणे यांचा परिचय प्रा. भ. पु. कालवे यांनी करून दिला.