महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यपध्दतीचे कारण पुढे करून आक्रमक झालेले अपक्ष आमदार विलास लांडे व लक्ष्मण जगताप यांनी त्यांच्यावर ‘हल्लाबोल’ केला, त्याचे अपेक्षेप्रमाणे मंगळवारी तीव्र पडसाद उमटले. दोन पालिका सभा व एक स्थायी समिती सभा अपुऱ्या गणसंख्येचे कारण देऊन तहकूब करण्यात आल्या.
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या मुद्दय़ावरून िपपरी पालिकेतील लोकप्रतिनिधी व आयुक्तांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र संघर्ष सुरू आहे. त्यातूनच महापौर मोहिनी लांडे यांनी लाल दिव्याची मोटर वापरणे बंद के ले होते. नगरसेवकांच्या बैठकीत अजितदादांनी आयुक्तांना पाठबळ दिल्याचे स्पष्टपणे दिसून आले होते. मात्र, राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी व आमदार यांचा आयुक्तांशी संघर्ष सुरूच होता. त्याचा अखेर उद्रेक झाल्याने आमदार लांडे व जगताप यांनी आयुक्तांवर कडाडून हल्ला चढवला. आमदारांनी केलेल्या बेछूट आरोपांमुळे आयुक्त तीव्र नाराज झाले. या विषयी आयुक्तांनी काल मौन बाळगले होते. मंगळवारी देखील त्यांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. चिंचवडला अ‍ॅटो क्लस्टर येथील पालिकेचा कार्यक्रम झाल्यानंतर ते मुंबईला निघून गेले.
नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात तहकूब करण्यात आलेली पालिका सभा मंगळवारी दुपारी होणार होती. मात्र, अनधिकृत बांधकामाविषयी प्रलंबित प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होत नाही, तोपर्यंत पालिका सभा न घेण्याचा इशारा आमदारांनी कालच दिला होता. त्यानुसार, महापौर लांडे यांनी दोन्हीही सभा तहकूब ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले. या दोन्ही सभा येत्या ११ फेब्रुवारीला होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सभा तहकूब झाल्याचे भलतेच दडपण स्थायी समितीने घेतले. स्थायीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनीही स्थायी समितीची सभा गणसंख्येचे कारण देत तहकूब ठेवली.