ज्या शेतकऱ्यांसाठी जायकवाडी धरण बांधले, त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थिती आहे. सध्या धरणात केवळ २३ टीएमसी पाणी आहे. स्थिती अत्यंत गंभीर आहे. आता जायकवाडी धरणाची चर्चा केवळ पिण्याच्या पाण्याच्या अंगानेच केली जात आहे. मराठवाडय़ातील चार जिल्ह्य़ांत तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे अनेकजण त्यावर विसंबून आहेत. औरंगाबाद महापालिकेतील पदाधिकारी या सर्व पाणी प्रश्नावर काहीच भूमिका घेत नाहीत. याच्या निषेधार्थ महापालिकेसमोर शुक्रवारी पिपाणी वाजवून आंदोलन करण्यात आले. जायकवाडी जलाशयावर औरंगाबाद, जालना, अंबड, पैठण, वाळूज, पंढरपूर, गंगापूर यांसह अनेक गावे अवलंबून आहेत. याबरोबरच शेवगाव, नेवासे, पाथर्डी तालुक्यांतील नगरपालिका व ग्रामपंचायतींना किती पाणी लागणार, याचा हिशेब अजूनही प्रशासनाकडे उपलब्ध नाही. पाण्यासाठी नगर व नाशिक जिल्ह्य़ांतील नेते आक्रमक आहेत. वरच्या भागातील धरणांमध्ये अधिक पाणी असतानाही त्याचे समन्यायी वाटप होत नाही. पावसाळ्यात १२ टीएमसी पाणी वळविण्यात आल्याचा दावा करीत जायकवाडी पाणी संघर्ष समितीने पिपाणी आंदोलन केले.
गेल्या आठ महिन्यांत शहरात पिण्याच्या पाण्यावरून अनेक ठिकाणी वाद झाले आहेत. स्थिती अजून हाताबाहेर गेली नाही. पण हक्काचे पाणी मिळाले नाही तर नेत्यांना व नगरसेवकांना रस्त्यावरदेखील फिरता येणार नाही एवढी वाईट स्थिती असेल. त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी नगरसेवकांनीही या लढय़ात सहभागी व्हावे. या जाणीव जागृतीसाठी पिपाणी वाजविण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे जायकवाडी पाणी संघर्ष समितीच्या जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले. येत्या १७ सप्टेंबरला होणाऱ्या महामोर्चात नगरसेवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या आंदोलनात विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pipani agitation infront of corporation of jayakwadi sangharsh samiti
First published on: 07-09-2013 at 01:57 IST