पोलीस आयुक्तांनी केलेल्या उपाययोजनांमुळे दोन वर्षांत शहरातील गुन्हेगारीवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण आले असताना गेल्या महिनाभरात शहरात पुन्हा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून खून, लूटमार, सोनसाखळी हिसकावून पळणे यांसारखे गुन्हे सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरत आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी गुन्हेगारांवर कारवाई करताना पोलीस आयुक्तांनी कोणत्याही राजकीय दबावाची पर्वा करू नये, गुन्हेगार कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असेल तरी कारवाई करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांना करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने सरंगल यांची भेट घेऊन त्यांना गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्यासंदर्भात निवेदन दिले. मंगळवारी अंतर्गत वादातून शहरातील गुन्हेगारी जगताशी संबंधित मोहन चांगले आणि त्याच्या साथीदाराची हत्या झाल्याने शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या हत्या प्रकरणात थेट महापौरांच्या भावाचे नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तातडीने आयुक्तांना निवेदन देण्यात आल्याने त्यालाही राजकीय अर्थ असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या आठवडय़ापासून खून, हत्या, सोनसाखळी चोरी आणि हाणामारीच्या घटनांमध्ये शहरात वाढ झाली आहे. दीड वर्ष शांत आणि सुरक्षित असलेल्या शहरात अचानक गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे ‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये पकडण्यात आलेल्या गुन्हेगारांचे नंतर पुढे होते काय, हा प्रश्नच आहे. नाशिककरांना सुरक्षित करण्यासाठी गुन्हेगारांवरील कारवाईवेळी होणारा राजकीय हस्तक्षेप आयुक्तांनी झुगारावा, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. शहरातील गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम राबवून नागरिकांना भयमुक्त करण्याचे आवाहन या शिष्टमंडळाने केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र पगारे, अर्जुन टिळे, छबू नागरे आदी उपस्थित होते.