मध्यरात्रीच्या सुमारास माय-लेकीचे अपहरण करण्याच्या प्रयत्नाबाबत दाखल गुन्ह्य़ात रविवारी रात्री पुन्हा दोघांना नवा मोंढा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांना १८ मार्चअखेर पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात एकूण तीन आरोपींना अटक झाली. एक जण अजून पसार आहे.
घटनेच्या दिवशी अमरदीप रामचंद्र रोडे यास नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली. अमरदीप सराईत गुन्हेगार आहे. त्याचे वडील रामचंद्र रोडे फौजदार आहेत.
रविवारी रात्री सुयोग कॉलनीत घटनास्थळीच पोलिसांनी अमरदीपला पकडले. संबंधित महिला व तिच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न होत असताना नागरिकांनी आरडाओरड केल्यामुळे घटनास्थळाहून अन्य तिघे मोटरसायकलवरून पसार झाले. रविवारी दिवसभर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत रात्री उशिरा संदीप ऊर्फ पिंटू शंकर साबने (वय २०, हडको) व हर्षवर्धन ऊर्फ पप्पू बबनराव आव्हाड (वय २२, पार्वतीनगर, परभणी) या दोघांना अटक केली. आरोपी रोडे यास न्यायालयाने १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली.
नवा मोंढय़ाचे फौजदार तानाजी दराडे यांना पिंटू व पप्पू या दोन आरोपींना तिसरे न्यायदंडाधिकारी गिरी यांच्यासमोर उभे केले असता न्यायालयाने या दोघांची १८ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. गुन्ह्य़ातील एक आरोपी फरारी आहे.
दरम्यान, शहरातल्या मध्यवस्तीत अशी घटना घडल्याने पालकवर्गात चिंता व्यक्त केली जात असून गल्लीबोळातील अशा टोळ्यांवर पोलिसांकडून जरब बसावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.