आलेल्या तक्रार अर्जानुसार कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना जेजुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहात पकडले.
राम मनोहर मोहिते (वय ५५, रा. माळेगाव, नसरापूर, ता. भोर) असे अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी दादासाहेब शिवाजी पवार (वय ३८, रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पवार यांनी जगताप नावाच्या व्यक्तीबरोबर जेजुरी ढाब्यावर दोन महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्यानुसार जगताप यांनी पवार यांच्या विरुद्ध वाल्हा पोलीस चौकीत तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदार मोहिते यांनी पवार यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली. त्यानुसार पवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलीस उपअधीक्षक राजेंद्र गलांडे, पोलीस निरीक्षक प्रकाश शिंदे, अश्विनी सातपुते यांच्या पथकाने गुरुवारी जेजुरी रस्त्यावरील याकुबभाई गॅरेज येथे सापळा रचला. मोहिते यांना सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पंचासमक्ष दहा हजाराची लाच घेताना अटक केली. याप्रकरणी सातपुते या अधिक तपास करत आहेत.