‘एन्ट्री फी’च्या नावाखाली तीन हजार रुपयांची लाच घेताना एका पोलीस उपनिरीक्षकाला भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पकडले. भंडारा येथील मन्रो चौकात शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ही कारवाई झाली.
अश्फाकअली जाफरअली सय्यद हे पकडलेल्या आरोपीचे नाव असून तो महामार्ग पोलिसांच्या भंडारा जिल्ह्य़ातील गडेगाव केंद्रात उपनिरीक्षक आहे. तुमसर येथील दिनेश नृसिंह देशमुख यांचे भंडारामधील मन्रो चौकात दीपक एजंसी नावाचे दुकान आहे. विंधन विहीर (बोअरवेल) खोदण्याचे ते कंत्राट घेतात. बोअरवेल खोदण्यासाठी विशेष वाहन (टीएन-२८-जे-४८८७) त्यांनी बोलावले होते. हे वाहन महामार्ग पोलिसांच्या गडेगाव केंद्रासमोर अडविण्यात आले. तेथील पोलीस उपनिरीक्षक आरोपी अश्फाकअली जाफरअली सय्यद यांनी हे वाहन जिल्ह्य़ात फिरावे, यासाठी ‘एन्ट्री फी’ म्हणून दर महिन्याला तीन हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. हे तीन हजार रुपये घेण्यास भंडारामधील मन्रो चौकातील दीपक ट्रेडर्समध्ये शुक्रवारी येणार असल्याचे सांगितले होते.
दिनेश देशमुख यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे कार्यालय गाठून तक्रार केली. भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक निशीथ मिश्र यांनी तक्रारीची शहानिशा करून सापळा रचण्याचे आदेश दिले. त्यांच्या व अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, निरीक्षक अशोक देवतळे व प्रताप इंगळे, हवालदार महेंद्र सरपटे, अमित डहारे, चंद्रशेखर ढोक, मनोज मेश्राम, मनोहर गभणे, राजेश ठाकरे यांनी आज सकाळी दीपक ट्रेडर्समध्ये सापळा रचला. तीन हजार रुपये लाच स्वीकारताना आरोपी अश्फाकअली याला या पथकाने पकडले.