विधानसभा निवडणुकीची शेवटची घटका जवळ आल्याने लक्ष्मी दर्शनाने आपली हक्काची मते दुसऱ्या उमेदवाराला मिळू नयेत ही मते आपल्याच उमेदवाराला मिळावीत यासाठी आता राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गावागावांतून रणनीती आखून आपल्या मतदारांच्या संरक्षणासाठी फिल्डिंग लावली आहे. ही फिल्डिंग मतदानाची अखेरची मुदत संपेपर्यंतही  ठेवण्यात येणार आहे.
मतदान हेच खरे श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. मात्र आता मताचे दान करण्यास मतदार राजा आता तयार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे दिवसातून चार पक्ष बदलणाऱ्या राजकीय नेत्यांना मतदारांसमोर ठेवलेला आदर्श आहे. त्यामुळे सध्या कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान होणार असेल तर मतदारांकडून अपेक्षा व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे काम न करता केवळ पैशांच्या जीवावर मतदारांचे मत खरेदी करून निवडूक जिंकता येते याचा अनुभव आल्याने विविध पक्षाच्या नेत्यांनीही मतांसाठी पैसे वाटून निवडूण येण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे.
राजकीय पक्ष आणि त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते हाच खरा पक्षकणा असतो. त्यांच्या जीवावर राजकीय नेत्यांचे राजकारण चालते, मात्र राजकारणातील पैशांचा वाढता प्रभाव आणि वैचारिक बैठक व निष्ठा यांचा झालेला ऱ्हास यामुळे केवळ कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक लढणे कठीण झाले आहे. असे असले तरी कमी संख्येने का होईना अनेक पक्षांवर निष्ठा असलेले मतदार आजही गावागावांत आहेत. या मतदारांनाही या संपूर्ण बदलत्या परिस्थितीमध्ये अपेक्षा असते त्यामुळे निष्ठावान असूनही आपल्याच पक्षाला ही मते मिळतील असा ठाम विश्वास आज कार्यकर्त्यांमध्ये राहिलेला नाही. गावात पक्षाला किती मते मिळाली हे आता उघड होत असल्याने नेत्यांकडे फुशारक्या मारणाऱ्या कार्यकर्त्यांना गावातील मते कायम ठेवण्याची मजबुरी आहे. त्यासाठीच आपली मते दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला मिळू नयेत याकरिता गावोगावी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत फिल्डिंग लावण्यात येणार आहे.