महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बोचरी टीका करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार जयंत ससाणे यांनाही कोपरखळ्या मारल्या. विखे व थोरात या दोघा काँग्रेस मंत्र्यांतील राजकीय दरी कमी होण्याऐवजी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
बाजार समितीच्या कार्यक्रमात विखे यांनी खंडकरी शेतक-यांच्या लढय़ाचे श्रेय नव्याने आलेले लोक घेत आहेत. शहरात थोरात यांनी उतारे वाटले व उतारा दिला. खंडकरी आंदोलनात माधवराव गायकवाड, माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्याबरोबरच अनेक लोक होते. आता जुने मागे पडले, त्यांचा विसर पडला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शहरालगतच्या जमिनी खंडक-यांना मिळाल्या पाहिजे. शिर्डीचाही तो प्रश्न आहे. सरकार यावर निर्णय घेईल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सकारात्मक आहेत. आकारी पडीक जमिनी, नवीन शर्त काढून टाकणे यावर निर्णय घेण्याचे थोरात यांनी सांगितले आहे. तुम्हाला काय करायचे ते करा, पण जे लढले त्यांनातरी बरोबर ठेवा अशी सूचना विखे यांनी केली.
श्रीरामपूरचा जनावरांचा बाजार बंद पडला, लोणीचा वाढला असे ससाणे यांनी भाषणात सांगितले होते. त्याबद्दल  विखे म्हणाले, लोणीची विश्वासार्हता आहे. लोणीच्या बाजाराची विश्वासार्हता आहे. श्रीरामपूरच्या बाजारात जर जनावरे विक्रीला आणली तर ती कुठे जातील याचा शोध लागत नाही, जनावरे कोणत्या गेटने येतील व कोणत्या गेटने जातील याचा नेम नाही. लोणीचा बाजार मात्र सुरक्षित आहे. ज्या गेटने जनावरे येतात, त्याच गेटने परत जातात. विश्वासार्हतेवर हा बाजार वाढला असल्याची कोपरखळी विखे यांनी ससाणेंना मारली. नेहमी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर टीका करणारे विखे यांनी या वेळी मात्र त्यांच्यावर टीका टाळली.