राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेली अनुसूचित जातीच्या शेतक ऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर पॉवर ट्रिलर देण्याची योजना नागपूर जिल्ह्य़ात कागदावरच असल्याचे उघडकीय आले आहे. या योजनेत निवड झालेले शेतकरी दोन वर्षांपासून पॉवर ट्रिलरच्या प्रतीक्षेत आहेत.
पॉवर ट्रिलर हे शेतीसाठी अत्यंत बहु उपयोगी असे उपकरण आहे. शेतीची मशागत करणे, बी व खत पेरणे, सिंचनासाठी पंप चालविणे, औषध फवारणे, मळणी व कडबाकुट्टी तयार करणे, शेतीतील मालाची वाहतूक करणे, गहू, धान, सोयाबीनची कापणी करणे, चिखलणी करणे, नांगरणी करणे व विद्युतजनित्र चालविणे अशा दहा प्रकारच्या कामांमध्ये या उपकरणाचा उपयोग होतो. अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर हे उपकरण देण्याची योजना राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत पॉवर ट्रिलर मिळावे म्हणून २०१०-११ मध्ये नागपूर जिल्ह्य़ातील अनुसूचित जातीच्या ११६ शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यामधून ५१ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. २०११-१२ मध्ये ९६ शेतकऱ्यांनी अर्ज केले, त्यामधून ७४ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. या दोन वर्षांत जिल्ह्य़ातून  रामटेक तालुक्यातून १०, मौदा १०, पारशिवनी ४, कामठी १, कुही ११, उमरेड ११, भिवापूर १६, नागपूर ग्रामीण ६, हिंगणा १, कळमेश्वर ५, सावनेर १४, काटोल १७, नरखेड ९ अशा एकूण १२५ शेतकऱ्यांची निवड झालेली आहे. या शेतकऱ्यांना अजूनही पॉवर ट्रिलर मिळालेले नाही. गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी या योजनेचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. अजून पॉवर ट्रिलर यायचे आहे, आल्यानंतर वाटप केले जाईल, असे उत्तर या विभागाकडून शेतकऱ्यांना मिळत आहे. कागदपत्रे तयार करण्यात व येण्या जाण्यात शेतकऱ्यांचे पैसै व वेळ खर्च झाला आहे.
शासनाने अनुसूचित जाती व इतर जमातीच्या शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिखाव्याच्या गोष्टी बंद करून तोंडाला पाने पुसणे थांबवावे आणि या योजनेत निवड झालेल्या शेतकऱ्यांना पॉवर ट्रिलरचे वाटप करावे, जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यातील अनुसूचित जातीच्या शंभर व इतर जातीच्या शंभर शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर दरवर्षी पॉवर ट्रिलर देण्याची योजना सुरू करावी, अशी मागणी या शेतकऱ्यांच्यावतीने संजय सत्येकार व रतन मेश्राम यांनी केली आहे.