यंत्रमाग कामगारांना दरमहा १० हजार रुपये वेतन मिळावे, या मागणीसाठी १४ जानेवारी रोजी कामगारांचा संप करण्यात येणार असल्याची घोषणा मेळाव्यात करण्यात आली. सर्व पक्षीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने इचलकरंजीतील थोरात चौकात आयोजित केलेल्या यंत्रमाग कामगारांच्या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी निमंत्रक डॉ.दत्ता माने होते. मेळाव्याला दोन हजारांवर कामगार उपस्थित होते. यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीचा त्रवार्षिक करार संपुष्टात आला आहे. नवीन करार व्हावा व कामगारांच्या मजुरीत वाढ व्हावी, यासाठी सर्व पक्षीय संयुक्त कृती समितीच्या वतीने लढा सुरू आहे. या अंतर्गत काही बैठकाही साहाय्य कामगार आयुक्तांसमवेत पार पडलेल्या आहेत. आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी थोरात चौकातील आठवडी बाजार मैदानात यंत्रमाग कामगारांचा मेळावा झाला. त्यामध्ये आठ तासाच्या पाळीला दररोज ४०० रुपये याप्रमाणे दरमहा १० हजार वेतन मिळावे, या मागणीसाठी १४ जानेवारीला कामगारांचा संप करण्याची घोषणा करण्यात आली. या दिवशी कामगारांनी काम बंद ठेवून सकाळी १० वाजता शाहू पुतळ्यापासून निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन कॉ.दत्ता माने यांनी या वेळी केले.
मेळाव्यात मिश्रीलाल जाजू म्हणाले, कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी यंत्रमाग कामगारांच्या प्रश्नांवर बैठक बोलवावी. यासाठी तीन वर्षे पाठपुरावा करूनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. कामगारांच्या मागण्या मान्य होण्यासाठी एक महिना काम बंद आंदोलन केल्याशिवाय यंत्रमागधारक व शासन जागे होणार नाही.     कॉ.भरमा कांबळे म्हणाले, कामगारांच्या मागण्या सहजासहजी मान्य होण्यासारख्या नाहीत. त्यामुळे शासनाला कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास भाग पाडावे लागेल.
कॉ.हणमंत पोवार म्हणाले,  गेल्या २८ वर्षांत यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाची फेररचना शासनाने केलेली नाही. कामगारविरोधी धोरण बदलण्यासाठी बेमुदत आंदोलनाची तयारी केली पाहिजे. मेळाव्यात राजेंद्र निकम, शिवाजी भोसले, परशुराम आगम, मदन मुरगुडे, सचिन खोंद्रे, शिवानंदपाटील, जीवन कोळी यांची भाषणे झाली. सुखदेव लाखे यांनी आभार मानले. कॉ.सुभाष कांबळे यांनी प्रास्ताविक केले.