महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या प्रतापगडावरील भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाला मोठय़ा दिमाखात प्रारंभ झाला. ‘जय भवानी, आई उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात प्रारंभ झाला.
मंदिर परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. दीपोत्सवाने प्रतापगड उजळून निघाला आहे. भवानीमातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी गडावरील मंदिरात होत आहे. यात महिलांची गर्दी जास्त आहे. प्रतापगड पंचक्रोशीत महाबळेश्वरसह सातारा, पुणे, कोकणातील भाविक गर्दी करत आहेत.
नवरात्रीनिमित्त देवीची विधिवत पूजा, नवचंडी, शतचंडी याग (होमहवन), दुर्गास्तोत्र पाठ, नवग्रहजप, भवानी सहस्र नामावळ, श्रीसूक्त आवर्तन आदी धर्मिक कार्यक्रम उत्साहात पार पाडले जातात. अष्टमीपर्यंत सर्व अनुष्ठान पूर्ण होऊन नवमीला सांगता होऊन पूर्णाहुती होते. ललिता पंचमीला शिवप्रतिमेची मिरवणूक काढली जाते. दिवसभराचे श्रीभवानीमातेचे धार्मिक कार्यक्रम संपल्यानंतर रात्री मशाली पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नगारे, तुतारी, सनई, ढोलताशा, लेझीमच्या आवाजात भगवे झेंडे फडकवत मशाल मिरवणूक काढण्यात आली. प्रतापगडावर विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. हे दृश्य फारच विलोभनीय दिसत आहे. देव उठल्यावर दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन व सीमोल्लंघन सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. विजयादशमीच्याा उत्तर रात्री लळिताच्या कीर्तनाने नवरात्रोत्सवाची सांगता होते.
नवरात्रोत्सवामुळे प्रतापगडावरील वातावरण भक्तिमय व चतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवात शिवाजीमहाराजांच्या वंशजांचा विशेष मान असतो. येथील नवरात्रोत्सवाचा संकल्प गडाचे मालक कल्पनाराजे भोसले व उदयनराजे भोसले यांच्या नावे सोडले जातात. देवीला कोणती साडी कोणत्या दिवशी नेसवायची हेही अगोदर ठरवलेले असते. देवीला काळय़ा रंगाची साडीही नेसवली जाते. अष्टमीच्या दिवशी फक्त स्त्रियांना भवानीमातेची पूजा करण्याची संधी मिळते. भवानी मंदिरात शिवाजीमहाराजांनी स्थापलेला व राजाराममहाराजांनी स्थापलेला अशा दोन घटांची स्थापना केली जाते. आज सकाळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रतापगडाचे मालक खासदार उदयनराजे भोसले, त्यांचे चिरंजीव प्रतापसिंहराजे भोसले, दमयंतीराजे भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. उदयनराजे भोसलेंचे पारंपरिक पद्धतीने प्रतापगडावर स्वागत करण्यात आले. नवरात्रीनिमित्त भवानीदेवीच्या प्रतापगडावर धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पाडले जात आहेत. खासदार उदयनराजेंनी देवीला चांदीचे मखर केले. या वेळी संपूर्ण गाभाराच चांदीने सुशोभित केला आहे.