श्रीरामपूरला सर्वपक्षीय आंदोलन
भंडारदऱ्यातून पाणी सोडणार
भंडारदरा धरणातून उद्या (गुरूवार) जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार असून लोकांचा विरोध मोडून काढण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, उद्या सकाळी १० वाजता सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे.
मुळा धरणातून आज पाणी सोडण्यात आले. उद्या भंडारदरातून, तर शुक्रवारी (दि. ३०)दारणा धरणातून पाणी सोडले जाणार आहे. भंडारदरातून ६ हजार दशलक्ष घनफूट पाणी पहिले पाच दिवस, नंतर १७७० दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाईल. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ हे आजपासूनच धरणावर तळ ठोकून आहेत. ७० पोलीस कर्मचारी बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात आले आहेत. भंडारदरा, निळवंडे, ओझर, तसेच १४ कोल्हापूर बंधाऱ्यांवर जलसंपदा विभागाचे कर्मचारी व पोलीस तैनात आहेत. तसेच तीन भरारी पथके गस्त घालणार आहेत. मुळा धरणासाठी ४० पोलीस कर्मचारी, दोन पथके नेमण्यात आली आहेत.
मुळा धरण ते जायकवाडी हे अंतर ६५ किलोमीटर आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यव कमी होईल. भंडारदरा ते जायकवाडी हे अंतर २०० किलोमीटरचे आहे. त्यामुळे तीन टीएमसी पाणी सोडले तरी दीड टीएमसीच पाणी जायकवाडीला मिळू शकेल. दारणा ते गंगापूर हे २०० किलोमीटरचे अंतर आहे. पण गोदावरी नदीवर असलेल्या सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणी आहे. त्यामुळे पाण्याची तूट कमी येईल. नऊ टीएमसी पाणी सोडले, तरी चार ते पाच टीएमसी पाणी जायकवाडीत पोहचू शकेल.
भंडारदरातून जायकवाडीला पाणी सोडले असताना त्याबरोबरच शेतीसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी होती. पण तांत्रिकदृष्टय़ा ते शक्य नाही. निळवंडेच्या दरवाजातून १७०० दशलक्ष घनफूट पाणी सोडता येते. त्यापेक्षा अधिक पाणी धरणातून बाहेर काढता येत नाही. त्यामुळे एकाच वेळी आवर्तन केले जाणार नाही. १५ डिसेंबरनंतर शेतीसाठी आवर्तन सोडले जाईल. दरम्यान, कारेगाव येथे आज सर्वपक्षांच्या कार्यकर्त्यांनी ग्रामसभा आयोजित केली होती. त्यांनी गटतट विसरून सर्वच पक्षांच्या नेत्यांना भेटून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. नंतर आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार जयंत ससाणे, राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची भेट घेऊन सर्वपक्षीय आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
उद्या सकाळी १० वाजता जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दीपक पटारे, भंडारदरा लाभधारक सर्वपक्षीय कृती समितीचे बाळासाहेब पटारे, सुभाष पटारे, मच्छिंद्र उंडे, सदाशिव पटारे, अशोक थोरे, राजेंद्र देवकर, प्रकाश चित्ते यांनी केले आहे.