तालुक्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंगविषयी अवाजवी शंभर रुपयांचे दोन प्रतिज्ञापत्रे घेत असून विद्यार्थ्यांची प्रचंड लूट सुरू आहे. महाविद्यालयाच्या या जुलमी प्रवृत्तीला आळा घालावा, अशी मागणी छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी केली आहे.
प्रांताधिकारी सुहास मापारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात जे विद्यार्थी राहतात त्यांच्याकडून महाविद्यालयाकडून रॅगिंगविषयी प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहेत. हे प्रतिज्ञापत्र १०० रुपयांच्या स्टँम्पवर लिहून द्यावे लागते. त्यावर मजकूर लिहिण्यासाठी ६० रुपये खर्च येतो. त्यानंतर ते सेतू कार्यालयात जमा करण्यासाठी ४० रुपये खर्च येतो. एका विद्यार्थ्यांकडून असे दोन प्रतिज्ञापत्रे लिहून घेतली जात आहेत. त्यामुळे एका विद्यार्थ्यांला ४०० ते ५०० रुपये खर्च येत आहे. रॅगिंगविषयीचे प्रतिज्ञापत्र १० रुपयांच्या स्टँम्पवर लिहून घ्यावे असे विद्यापीठाचे आदेश आहेत. त्यामुळे साध्या कागदावर १० रुपयांचे तिकिट लावून प्रतिज्ञापत्र घेतले जावे व ही प्रक्रिया सोपी करावी.
विद्यार्थ्यांना या सर्व प्रक्रियेसाठी तीन ते चार दिवस तहसील कचेरीत हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थी हा कमावता वर्ग नसल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारचे स्टॅम्प घेऊ नयेत, असे शासनाचे मार्गदर्शक तत्व आहे. महाविद्यालयाच्या या जुलमी प्रवृत्तीला आळा घालावा, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.