रात्री उशिरा पतीसह येताना चार तरुणांनी एका विवाहित युवतीवर तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार करण्याची घटना येथील गोविंदपूर-संजयनगर-शास्त्री वॉर्डात घडली. ही युवती चार महिन्यांची गरोदर आहे. याबाबतची तक्रार पीडित युवतीने शहर पोलीस ठाण्यात रात्री ३ वाजता नोंदविल्यावर पोलिसांनी लगेच संपूर्ण शहराची नाकाबंदी करून पहाटे चार आरोपींना अटक केली. यात विक्की सुर्यवंशी (२१), नितीन खडसे (२२), अविनाश फंडे (२१), डीसी उर्फ सोनू चंद्रिकापुरे (२४, सर्व रा.संजयनगर, गोंविदपूर) यांना अटक करण्यात आली. दरम्यान, एक आरोपी अटक केल्यावर घाबरल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चौघांचीही आज १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
गोंदिया शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही विवाहित युवती स्थानिक असून, तिचा उत्तरप्रदेशातील झासीनगर येथील युवकाशी प्रेमविवाह झाला. सोमवारी, रात्री हे दोघे नातेवाईकांकडे गोविंदपूर येथे गेले होते. तेथून हे पती-पत्नी रात्री ११.३० च्या सुमारास गोविंदपूरहून गोंदियाकडे येताना यांना वाटेतच चार तरुणांनी थांबविले.  एवढय़ा रात्री मुलीला घेऊन कुठे फिरत आहेस, असे धमकावून पोलिसात देण्याची धमकी त्यांना दिली. युवतीच्या पतीच्या भाषेवरून हा तरुण परप्रांतातील असल्याचे लक्षात आल्यावर या चारही तरुणांनी त्यांना धमकावून गोविंदपूर येथील आंबेडकर वॉर्डातील लायब्ररी परिसराच्या मागच्या बाजूच्या नेऊन दोघांनी तिच्या पतीला पकडून ठेवले व दोघांनी युवतीवर अत्याचार केले. नंतर त्यांना सोडून दिले. पण, लगेच काही वेळातच पकडून ठेवलेल्या दोघांनी त्यांना परत गाठले व त्यांना शास्त्री वॉर्डातील एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेले. तेथे एकाने मुलाला पकडून ठेवले व त्या युवतीवर आळीपाळीने अत्याचार केले.
त्यांच्या तावडीतून सुटल्यावर या पती-पत्नीने पहाटे ३ वाजता चौकशी करून शहर पोलीस ठाणे गाठले. तेथे या युवतीने आपबिती पोलिसांना सांगितल्यावर शहर पोलिसांनी याबाबतची माहिती गस्ती पथकाला देऊन लगेच पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांनाही दिली. त्यांनी संपूर्ण शहराची नाकेबंदी केली व या तरुणांच्या  शोधात घटनास्थळाजवळील परिसर िपजून काढला.
दरम्यान, एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सकाळच्या सुमारास त्याला पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांची नावे व पत्ते सांगितले. पोलिसांनी सकाळी ८ वाजेपर्यंत या चारही आरोपींना अटक केली.  शहर पोलिसांच्या या कामगिरीची संपूर्ण शहरात स्तुती केली जात आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप झलके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते, सहायक फौजदार भगत, थेर, दराळे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. यातील एक आरोपी विक्की राधेश्याम सुर्यवंशी हा गुन्हेगारीप्रवृत्तीचा असून, त्याला जिल्हा तडीपार करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.