कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. सार्वत्रिक निवडणूक वर्ष-सव्वा वर्ष दूर असली तरी विदर्भात उमेदवारीसाठी मोर्चेबांधणीचे आणि सोयीच्या राजकीय तडजोडींचे काम मात्र जोरात सुरू झाल्याचे संकेत विविध घडामोडींनी दिले आहेत.
पारंपरिक राजकीय शत्रूत्वाची पाश्र्वभूमी असलेल्या राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांनी यात उडी घेतली असून वर्धेचे खासदार दत्ता मेघे यांनी थेट प्रभा राव समर्थक गटावर शरसंधान साधून पुत्र सागर मेघेच्या उमेदवारीसाठी श्रेष्ठींना जाहीर साकडे घातले आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी वर्धेतील कट्टर राजकीय विरोधक रणजित कांबळे यांच्यावर तोफ डागण्यास कमी केले नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे येणारी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे आता  स्पष्ट झाल्याने सागर मेघे यांच्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली जात आहे. दुसरीकडे  दत्ता मेघे राजकीय निवृत्तीच्या उंबरठय़ावर असताना नितीन गडकरी यांना मात्र लोकसभेचे वेध लागले असून सातवेळा लोकसभेत निवडून गेलेले मुरब्बी राजकारणी विलास मुत्तेमवार यांच्याशी त्यांची नागपूर मतदारसंघात सर्वात लक्षवेधी लढत होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. यादरम्यान मुत्तेमवारांचे कट्टर विरोधक सतीश चतुर्वेदी अचानक सक्रिय झाले असून त्यांच्याकडून नागपूरच्या जागेवर दावा केला जाण्याचे संकेत मिळाले आहेत.
विदर्भातील सर्वात कट्टर राजकीय शत्रुत्त्वाचा इतिहास बाबासाहेब केदार आणि रणजित देशमुख यांच्या घराण्यांचा आहे. केदार-देशमुख संघर्षांच्या काळ्या कहाण्यांनी प्रत्येक निवडणूक चर्चेत राहिली आहे. दोन्ही नेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. परंतु, २००९ साली नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने रणजित देशमुखांचे पुत्र आशिष देशमुख यांना भाजपमध्ये ओढण्यात आले आणि थेट सावनेर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट देण्यात आले. या जागेवर पारंपरिक वर्चस्व ठेवण्यासाठी सुनील केदार यांना काँग्रेसतर्फे उभे करण्यात आले होते. सुनील केदार विरुद्ध आशिष देशमुख ही लढत विदर्भातील गेल्या विधानसभा निवडणुकीतील सर्वात कटु लढत राहिली होती. दोन्ही तरुण उमेदवारांच्या प्रचारादरम्यान अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून परस्परांवर चिखलफेक करण्यात आल्याने शत्रुत्वाला हिंसेचे गालबोट लागले होते. सुनील केदार ८ हजार मतांच्या फरकाने जिंकून आले होते.  रणजित देशमुख यांनी पुत्राच्या भाजप प्रवेशानंतरही काँग्रेसशी निष्ठा कायम ठेवली असून मध्यंतरीच्या काळात गडकरी विरोधात तोफ डागण्यास कमी केले नव्हते. या पक्षनिष्ठेचा फायदा मिळविण्यासाठी त्यांनी पुत्राला काँग्रेसची उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने वापर करून घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समजते.
या डावपेचाचा एक भाग म्हणून त्यांनी सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांच्याशी अलिखित करार केल्याची चर्चा अचानक रंगू लागली आहे. या करारानुसार आशिष देमुख भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चिन्हे असून त्यांच्यासाठी सावनेरचा विधानसभा मतदारसंघ सोडण्याची तयारी बाबासाहेब केदार यांनी दर्शविल्याचे कळते. परंतु, याला केदार गटाकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. या मुद्दय़ावर रणजित देशमुख समर्थकांनीही मौन बाळगले आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात आशिष देशमुख हे गडकरींबरोबर दिसले. गडकरींच्या वाडय़ावरही त्यांचे बरेचदा येणे-जाणे आहे. हाच निकष लावला तर सागर मेघे यांना भाजपात खेचण्यात गडकरी यशस्वी ठरले होते. परंतु, नंतर सागर मेघेंनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपलाच रामराम ठोकला होता आणि आता ते काँग्रेसकडून लोकसभेची तिकीट मागत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आशिष देशमुख काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर बोलून दाखविले.  
केदार-देशमुख राजकीय शत्रुत्व संपविण्यासाठी एका नेत्याने मोठी भूमिका बजावली असून या तडजोडीनुसार आशिष देशमुखांसाठी सावनेरची जागा सोडली जाईल आणि सुनील देशमुख रामटेक विधानसभा मतदारसंघातून लढतील, असे समजते.
रामटेक विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी सुबोध मोहिते प्रबळ दावेदार आहेत. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यापासून त्यांची राजकीय गणिते सतत चुकलेली आहेत. विमान वेळेत पोहोचू न शकल्याने विधान परिषद सदस्यत्वाचा अर्ज भरण्याची संधी त्यांच्या हातून सुटली होती. तेव्हापासून ते पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. रामटेकमध्ये शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांचे एकतर्फी वर्चस्व असले तरी लोकसभेत मुकुल वासनिकांनी शिवसेनेचा पत्ता साफ केला होता. त्यामुळे सुनील केदारांसारखा तगडा उमेदवार देऊन जयस्वाल यांना अडचणीत आणण्याची खेळी काँग्रेसतर्फे खेळली जाऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparation started in vidharbha drama of political settlement
First published on: 10-05-2013 at 04:15 IST