अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे येत्या १९ व २० जानेवारी २०१३ या दोन दिवसांत पार पडणाऱ्या अकराव्या विद्रोही साहित्य सांस्कृतिक संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस कॉम्रेड धनाजी गुरव व उपाध्यक्ष विजय मांडके यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रा. गौतम काटकर, अकराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. जालिंदर घिगे, सचिव प्रा. भास्कर बुलाखे, सांगलीचे अॅड. के. डी. शिंदे, विकास मगदूम यांची पत्रकार बैठकीला उपस्थिती होती. धनाजी गुरव म्हणाले, की बाबुराव गुरव हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे स्थापनेपासूनचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक व पुरोगामी कष्टकरी चळवळीतील योगदानाचा विचार करून यंदाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लावण्यात आली आहे. विजय मांडके यांनी प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांच्या एकंदर कार्याची माहिती विशद केली.