ठाणे-वाशी हार्बर मार्गावरील वाशी या गजबजलेल्या रेल्वे स्थानकात साधी पिण्याच्या पाण्याची सुविधादेखील नाही. मात्र असे असताना सिडको आणि पोलिसांच्या आशीर्वादाने या ठिकाणी भेळवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. निकृष्ट दर्जाच्या या भेळमुळे अनेकांना आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशी रेल्वे स्थानकातून दैनंदिन हजारो रेल्वे प्रवासी ये-जा करतात. याच रेल्वे स्थानकात साधे बूट पॉलिश वालेदेखील नाहीत. तर पिण्याच्या पाण्यासाठी साधी पाणपोईदेखील सिडकोने उभारलेली नाही. असे असताना या रेल्वे स्थानकात मात्र भेळवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. मागील वर्षभरात या ठिकाणी भेळवाल्यांची संख्या आता चक्क दहा झाली आहेत. वाशी रेल्वे पोलिसांच्या चौकीलगतच हे भेळवाले आपले सामान ठेवतात. भळवाल्यांनी प्रत्येक फलाटावर कब्जा केल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या महिला आणि प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला पाच रुपयांना असणारी भेळ ही आता दहा रुपये झाली आहे. असे असतानाही या भेळवाल्याचे कंत्राट घेतलेल्या एका व्यापाऱ्याने प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू केला आहे. निकृष्ट दर्जाचा कांदा, टॉमॅटो, सडका िलबू पिळून प्रवाशांच्या माथी हानीकारक भेळ मारली जात आहे. हे सर्व भेळवाले परप्रांतीय असून पोलिसांना हाताशी धरून या भेळवाल्यांनी आपली चलती सुरू ठेवली आहे. तर सिडकोच्या आधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन हे भेळवाले देऊन बिनधास्तपणे भेळ विक्री करत आहेत. या भेळवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problems created on vashi railway station due to vendors
First published on: 06-11-2014 at 07:22 IST