गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅन्ड इकॉनॉमिक्सचे माजी कुलसचिव व अर्थशास्त्राचे प्राध्यापक दत्तात्रय पांडुरंग आपटे (वय ८६) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांनी नेत्रदान व देहदानही केले.
त्यांच्या मागे पत्नी व प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आशा, मानववंशशास्त्र व लोकआरोग्य क्षेत्रातील नामवंत शिक्षणतज्ञ प्रा. हेमंत, कामाकावो फाऊंडेशनचे अध्यक्ष अजय हे दोन मुलगे, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे. आपटे यांनी गोखले संस्थेमध्ये तीन दशके विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांनी जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि टोकियो येथील मेजी विद्यापीठातील प्रा. यमातो कामाकावो यांच्याबरोबर अनेक वर्षे संशोधन केले. तसेच के.ई.एम हॉस्पिटल रीसर्च सेंटर, महर्षी कर्वे शिक्षण संस्था, माता-बाल उत्कर्ष प्रतिष्ठान आदी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.