जनकवी पी. सावळाराम यांचे जन्मशताब्दी वर्ष ४ जुलैपासून सुरू होत असून यानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या जनकवी पी. सावळाराम जन्मशताब्दी समितीच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या ४ जुलै रोजी गडकरी रंगायतन येथे रात्री ८ वाजता आयोजित विशेष कार्यक्रमाने या सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी उपस्थित राहणार  आहेत. हे वर्ष जनकवींचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने वर्षभर आयोजित विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते साजरे केले जाणार आहे. यानिमित्त पी. सावळाराम भावगीत-भक्तिगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी लिहिलेल्या भावगीतांवर आधारित गाण्यांचे कार्यक्रमही संस्थेच्या वतीने राज्यभर आयोजित केले जाणार आहेत.  पी. सावळाराम यांच्या साहित्याची ओळख आजच्या तरुण पिढीला करून देण्याच्या उद्देशाने www.jankavipsavlaram.com या संकेतस्थळाच्या निर्मितीचे कामही हाती घेण्यात आले आहे. पी. सावळाराम यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांसाठी कथा-पटकथांचे लेखन केले आहे. तसेच त्यांनी लिहिलेल्या २५० हून अधिक गीतांचे पाश्र्वगायन लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, तलत मेहमूद, मन्ना डे, हृदयनाथ मंगेशकर यांसारख्या दिग्गज गायकांनी केले आहे.