बदलापूरमध्ये मालमत्ताकरात मोठी वाढ!

ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवलीसह जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या महापालिकांनी नाकारलेली भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता करप्रणाली

ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवलीसह जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या महापालिकांनी नाकारलेली भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता करप्रणाली स्वीकारण्याचा धक्कादायक निर्णय कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने घेतला असून या नव्या करप्रणालीमुळे येथील रहिवाशांच्या मालमत्ताकरात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी बदलापुरात मालमत्ताकराची आकारणी करताना भाडेमूल्यावर आधारित करप्रणाली आखली जात होती. यापुढे प्रत्येक मालमत्तेचे भांडवली मूल्य विचारात घेऊन त्यानुसार कराची आकारणी होणार आहे. त्यामुळे शहरात नव्याने उभ्या रहाणाऱ्या मालमत्तांना जादा कर बसेल, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.  
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नवीन करप्रणालीनुसार मालमत्ताकरात साडेतीन पटीने करवाढ करण्यात आली आहे. ही करवाढ १ एप्रिल २०१४ पासून लागू करण्यात आली आहे. राज्यात इतर कोणत्याही नगरपालिकेत अशा प्रकारची कर आकारणी करण्यात आलेली नाही. केवळ मुंबई महापालिकेने ती स्वीकारली आहे. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या या करप्रणालीविरोधात कोणीच आवाज उठवत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात मोठय़ा प्रमाणात इमारती उभारण्यात येत आहेत. काही मोजके बांधकाम व्यावसायिक सोडले तर इतर बांधकामे ही राजकीय मंडळींचीच आहेत. त्यामुळे पालिकेत बांधकामाचा आराखडा मंजुरीला कोणतीही आडकाठी येत नाही. आधीच नियोजन फसलेल्या आणि विकसित होत असलेल्या शहरासारखी बदलापूरची आज अवस्था झाली आहे. शहराचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. परंतु तो राजकारणी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या सोयीनुसार झाल्याची टीका जाणकारांकडून करण्यात  येत आहे.
भाडेमूल्यावर आधारित कर रद्द
नगरपालिकेने नवीन करप्रणाली स्वीकारल्यामुळे आधीची भाडे मूल्यावर आधारित कर पद्धत बंद झाली आहे. परिणामी पूर्वी ज्या घर मालकाला १० रुपये इतका कर भरावा लागत होता. तो नवीन रचनेनुसार आता सुमारे ३५ रुपये भरावा लागणार आहे. तब्बल साडेतीनपट करवाढ करण्यात आली आहे. अशा पद्धतीने करवाढ करण्यापूर्वी पालिकेने नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक होते. ठाणे महापालिकेनेही भांडवली मूल्यावर आधारित कर आकारण्याचे ठरविले होते. तत्कालीन आयुक्त राजीव यांनी या संदर्भात नागरिकांच्या सूचना व हरकती मागविल्या होत्या. नागरिकांचा विरोध बघता ठाणे महापालिकेने ती स्वीकारलेली नाही. वास्तविक बदलापूर नगरपालिकेने भाडे मूल्यावर आधारित कर रचना ठेवत टप्प्याटप्प्याने वाढविणे अपेक्षित होते. परंतु नागरिकांवर अन्याय करणाऱ्या करवाढीला कोणीच विरोध केला नाही. बदलापूर पालिकेने सहा हजार घरमालकांना वाढीव कराची नोटीस पाठविली आहे.
प्रशासनाने नाक दाबून तोंड उघडले?
नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणीसाठी पालिका प्रशासन आग्रही होते. तत्कालीन मुख्याधिकारी राजेश कानडे यांनी पालिका उत्पन्नात वाढ करण्यासाठी शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेत कर आकारणी सुचवली. प्रथम त्याला काहीसा विरोध झाला. नंतर त्या मुख्याधिकाऱ्यांनी काही कंत्राटदारांची बिले थकवत पालिकेच्या मुख्य प्रकल्पांसाठी निधी वळवला. त्याचा मोठा फटका काही नगरसेवकांना बसल्याने त्यांनी या करप्रणालीला असलेला काहीसा विरोध मवाळ केला. आणि भांडवली मूल्यावर आधारित कर रचना १ एप्रिल २०१४ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला.
कर आकारणीत तफावत
नगरपालिकेच्या निर्णयानुसार १ मार्च २०१४ च्या पूर्वी ज्यांना कर लागू झाला आहे त्यांना पूर्वीचा दर आहे, आणि ज्या इमारतींना १ एप्रिल २०१४  पासून कर लागू झाला त्यांना नवीन दर लागू करण्यात आला आहे. म्हणजेच १ मार्चपर्यंतच्या इमारतींना १० रुपये कर लावला असेल तर १ एप्रिलपासूनच्या इमारतींना ३५ कर आकारण्यात आला आहे. पालिकेने नवीन करानुसार सुमारे तीन हजार सहाशे नागरिकांना कराच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे जुना कर आणि नव्याने रूढ होत असलेल्या कराबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
अन्यायकारक कर रद्द करा : शिंदे
जुन्या आणि नवीन करामुळे शेजारी शेजारी असलेल्या इमारतींमधील करात तफावत दिसते. नागरिकांना या वाढीव कराबाबत कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आली नाही. कोणत्याही पालिकेने भांडवली मूल्यावर आधारित कर रचना स्वीकारली नाही. हा नागरिकांवरील अन्यायकारक कर रद्द करावा, तसेच या संदर्भातील संभ्रम दूर करावा. त्याचप्रमाणे नागरिकांना विश्वासात घेऊन करवाढ करावी, अशी मागणी माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केली आहे.
करवाढ नाही : नगराध्यक्ष
पालिकेने कोणावरही अन्याय केला नाही. प्रशासनाने मनमानी करून १५० पट करवाढ करण्याचे ठरविले होते. पण आम्ही ती होऊ दिली नाही. भांडवली मूल्यावर आधारित कर रचना करून प्रशासनाला नमते घ्यायला लावले. तसेच प्रशासनाच्या प्रस्तावानुसार सध्या दोन हजार रुपये कर असणाऱ्या घर मालकाला १२ हजार रुपये कर लागू झाला असता. तो आम्ही सहा हजारांवर आणला आहे. त्याचप्रमाणे पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना कोणतीही करवाढ लागू होणार नाही, असा दावा नगराध्यक्ष उषा म्हात्रे यांनी केला आहे.
समीर पारखी, बदलापूर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Property tax increased in badlapur

ताज्या बातम्या