शाहुपुरी पोलीस ठाण्याकडे कार्यरत असणाऱ्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या घरातच वेश्या अड्डा चालत असल्याचे अपर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह यांच्या विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यातून समोर आले. शाहुपुरी व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा  टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या आठ महिलांसह त्यांच्या एजंटना अटक  केली.
याबाबत अपर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह यांनी सांगितलेली माहिती अशी, शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुखसागर लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती समोर आल्याने आज सायंकाळच्या सुमारास त्या लॉजवर छापा टाकला. येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या तीन मुली ओडीसा येथून आल्या होत्या. या मुलींना कोल्हापुरात आणणाऱ्या विश्वास चंदन दबडे (रा. पुलाची शिरोली) याला पोलिसांनी अटक केली. याचप्रमाणे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंगवले कॉलनी येथील ओम शिवकुमार या बंगल्यावर पोलीस बनावट गिऱ्हाईक म्हणून गेले. येथे असणाऱ्या एजंटकडे त्यांनी वेश्यांची मागणी केली. व्यवहार ठरल्यानंतर त्याने येथील महिलांना दाखवले. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी येथे व्यवसाय करणाऱ्या पाच महिलांना ताब्यात घेतले. तसेच एजंट राजू बाबुराव चव्हाण (वय ४१, रा. संभाजीनगर एस. टी स्टँडजवळ, कोल्हापूर ) याला व या मुलींची ने-आण करणाऱ्या प्रफुल्ल जयसिंग क्षीरसागर (वय ४०, रा. साळोखेनगर, कोल्हापूर) या रिक्षाचालकाला रिक्षासह अटक केली. इंगवले कॉलनी येथील वेश्या व्यवसाय ज्या बंगल्यात चालत होता तो बंगला शाहुपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सुमन माडीवाल या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा होता. तिने हा बंगला दीड महिन्यापूर्वी भाडय़ाने दिला होता.