पिण्यासाठी पाणी हा मुख्य निकष असून सद्यस्थितीत शेतीसाठी पाणी वापरल्यास मोटारी जप्त करून कनेक्शन बंद करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिला आहे. जनावरांच्या छावण्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या भागांमध्ये सुरू करण्याचे निर्देश तहसीलदारांना देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळाच्या प्रश्नावर बैठक घेतली. जिल्हाधिकारी विकास देशमुख, आमदार रमेश थोरात, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, रणजित शिवतरे, संभाजी होळकर, सुदाम इंगळे यांच्यासह बारामती मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पुढील सहा महिन्यांचा विचार करून पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी चारा व मजुरांना काम देण्याचे व्यवस्थित नियोजन करण्याच्या सूचना सुळे यांनी यावेळी केल्या. तेव्हा पाणीटंचाईशी सामना करण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.