पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार असून विद्यापीठामध्ये विविध क्षेत्रातील दीड हजार कंपन्या ‘कॅम्पस इन्टरव्ह्य़ू’साठी येणार आहेत.
पुणे विद्यापीठामध्ये आता विविध क्षेत्रातील साधारण दीड हजार नामांकित कंपन्या ‘कॅम्पस इन्टरव्ह्य़ू’ घेणार आहेत. ‘सिझनल’ या स्वयंसेवी संस्था आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या ‘युवा जागर’ या प्रकल्पाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक आठवडय़ामध्ये एक दिवस या प्रमाणे तीन वर्षे कंपनीकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. टीसीएस, पटनी यांसारख्या माहिती तंत्रज्ञानातील नावाजलेल्या कंपन्यांबरोबर भोसरी, हिंजवडी, पिंपरी-चिंचवड, चाकण, रांजणगाव, नाशिक येथील एम.आय.डी.सी मधील कंपन्यांचा या योजनेमध्ये सहभाग आहे. प्रामुख्याने मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या आहेत. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे. दोन किंवा तीन महाविद्यालयांचे एक केंद्र तयार करून प्रत्येक केंद्रावर कंपन्यांमार्फत प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा विचार विद्यापीठामार्फत करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या नाशिक आणि नगर उपकेंद्रांवरही हे प्रशिक्षण वर्ग होणार आहेत. या बाबत विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. पंडित शेळके यांनी सांगितले, ‘‘कंपन्यांकडून प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी होत असते. मात्र, त्याचवेळी पदवी घेऊनही बेकार असलेल्या युवकांची संख्या मोठी आहे. हा विरोधाभास कमी करण्यासाठी ही योजना मदत करेल. कंपन्यांना त्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांनाही नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध
होणार आहेत. पुढील महिन्यापासून ही योजना कार्यान्वित होणार
आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत
ही  योजना पोहोचवण्यासाठी
प्रत्येक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.’’