तालुक्यातील पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे काम प्रगतीपथावर असताना जनतेची दिशाभूल करण्याचे काम पुणेगाव-दरसवाडी कृती समितीने करू नये असे आवाहन एकिकडे समता परिषदेचे तालुका अध्यक्ष मोहन शेलार यांनी केले असताना तळवाडे येथे झालेल्या पाणी परिषदेत काम अजून पूर्ण का होत नाही, असा सवाल करण्यात आला आहे. या विषयावर १५ जानेवारी रोजी सायगाव येथे दुसरी पाणी परिषद घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शेलार यांनी १९७९ मध्ये जनार्दन पाटील यांच्या कार्यकाळात पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे काम झाले. मात्र धरणातून थेट कालव्याव्दारे साठवण बंधारे भरण्याच्या योजनेस निधी कमी पडला आणि हे काम बंद पडल्याचा इतिहास सांगितला. छगन भुजबळ यांनी या योजनेच्या कामास गती दिली. योजनेत ९० किलोमीटर कालव्याव्दारे पाणी येणार असून चांदवड तालुक्यातील पाच पाझरतलाव तर येवले तालुक्यातील ३५ पाझर तलाव आणि दोन लघू पाट तलाव भरण्याचे नियोजन आहे. कृती समितीने यासाठी काही प्रयत्न केले का, असा सवालही शेलार यांनी केला आहे. भुजबळांना बळ देण्याऐवजी काम पूर्ण होण्याआधीच बैठका घेऊन केवळ प्रसिद्धीसाठी जनतेमध्ये गैरसमज पसरवू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, कालवा समितीच्या वतीने मंगळवारी तळवाडे येथे पाणी परिषद घेण्यात आली. कालव्याचे काम पूर्ण होण्यात येणाऱ्या अडचणी त्वरीत दूर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाशी या विषयावर संपर्क साधल्यास समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही, अशी तक्रार यावेळी वक्त्यांनी केली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी डोंगरगावचे पंडित मोहन होते. मोहन गुंजाळ यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले.