माळीवाडा केंद्र तासभर बंद; मनसेचे रास्ता रोको

काहींच्या  लसीकरणासाठी नगरसेवकांचा दबाव नगर : आपण पाठवलेल्या नागरिकांना प्राधान्याने करोना प्रतिबंधक लस द्यावी, असा दबाव नगरसेवकांकडून टाकण्याचा अजब प्रकार शहरातील महापालिकेच्या माळीवाडा आरोग्य केंद्रावर झाला. या निषेधार्थ या केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुमारे तासभर लसीकरणाचे काम बंद ठेवले. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रास्ता रोको आंदोलन केले. शहरातील इतर आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरळीत सुरू असताना केवळ […]

शहरातील महापालिकेच्या माळीवाडा आरोग्य केंद्रातील लसीकरण बंद पडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्रासमोरील रस्त्यावर रस्तारोको आंदोलन केले.

काहींच्या  लसीकरणासाठी नगरसेवकांचा दबाव

नगर : आपण पाठवलेल्या नागरिकांना प्राधान्याने करोना प्रतिबंधक लस द्यावी, असा दबाव नगरसेवकांकडून टाकण्याचा अजब प्रकार शहरातील महापालिकेच्या माळीवाडा आरोग्य केंद्रावर झाला. या निषेधार्थ या केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुमारे तासभर लसीकरणाचे काम बंद ठेवले. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रास्ता रोको आंदोलन केले. शहरातील इतर आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरळीत सुरू असताना केवळ माळीवाडा केंद्रातच वारंवार अडथळे निर्माण होत आहेत, याकडे मनपाचे अधिकारी लक्ष वेधत आहेत.

महाराष्ट्र दिनापासून नगर शहरात १८ वर्षांवरील नागरिकांचे करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १० हजार डोस उपलब्ध झाले आहेत. शहरातील केवळ तोफखाना व सावेडी आरोग्य केंद्रातच ४५ वर्षांवरील नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण केंद्र सुरू आहे. इतर चार केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण सुरू आहे. मात्र या लसीकरणासाठी कोविन अ‍ॅपवर पूर्वनोंदणी आवश्यक आहे. या नोंदणी केलेल्या नागरिकांना कोणत्या तारखेला लसीकरणासाठी उपस्थित राहायचे हे सांगितले जाते.

मात्र माळीवाडा आरोग्य केंद्रात काही नगरसेवक आपल्या जवळच्या नागरिकांना पाठवून तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांनाच प्राधान्याने लसीकरण द्यावे यासाठी दबाव आणत आहेत. नागरिक लसीकरणासाठी सकाळपासून उन्हात रांगा लावतात, मात्र काही नगरसेवकांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांंना मध्येच घुसवण्याचा प्रयत्न होतो. परिणामी रांगेतील नागरिकांना ताटकळत रहावे लागते. याचा रोष आज, मंगळवारी निर्माण झाला. त्यातून लसीकरण करणारे कर्मचारी तिथून निघून गेले. त्यामुळे लसीकरण बंद पडले. नागरिकही अस्वस्थ झाले. गोंधळ वाढू लागला.

त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन भुतारे यांच्यासह नागरिकांनी केंद्रासमोर भर उन्हात रास्ता रोको केले. त्यामुळे या गोंधळामुळे लसीकरणासाठी रांगेत उभे असलेले नागरिक रांग सोडून केंद्रात जमा झाले. परिणामी सामाजिक अंतराच्या नियमाचा फज्जा उडाला. पोलिसांनीही तेथे धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. नंतर तासाभराने आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुन्हा लसीकरण सुरू केले.

माळीवाडा केंद्र तासभर बंद; मनसेचे रास्ता रोको

राज्य सरकारच्या मोफत लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत असताना केंद्र सरकारच्या नियमामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. अनेक नागरिक साधारण कुटुंबातील असतात, त्यांच्याकडे साधे फोन असतात. त्यांना ऑनलाइन नाव नोंदणी करता येत नाही. तसेच ऑनलाइन नाव नोंदणीसाठी आवश्यक असणारे मोबाइलही त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे नागरिक लसीकरणापासून वंचित राहात आहेत, या ऑनलाइन नोंदणी नियमात सुधारणा करावी, अशा मागणीचे पत्र आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे.

केवळ माळीवाडा केंद्रात अडथळे; इतर ठिकाणी सुरळीत

महापालिकेच्या शहरातील केवळ माळेवाडा आरोग्य केंद्रातील लसीकरणातच वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. इतर सर्व आरोग्य केंद्रांवर लसीकरण व्यवस्थित सुरू आहे. माळीवाडा केंद्रात असेच अडथळे निर्माण होत राहिल्यास तेथील लसीकरण केंद्र स्थलांतरित करावे लागेल व तेथील नागरिकांची अन्य केंद्रात लसीकरणाची व्यवस्था केली जाईल.

—यशवंत डांगे, उपायुक्त, मनपा, नगर.

दबाव आणणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा

माळीवाडा भागातील आरोग्य केंद्रावर  लसीकरणासाठी या परिसरातील नगरसेवक आरोग्य कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात, ऑनलाइन नोंदणी केलेली नसतानाही आपल्या कार्यकर्त्यांंना लसीकरण करावे यासाठी दबाव आणतात. याबरोबरच महापालिकेनेही लसीकरणासाठी योग्य नियोजन केलेले नाही. दबाव आणणाऱ्या नगरसेवकांवर मनपाने गुन्हे दाखल करावेत.

—नितीन भुतारे,

जिल्हा संघटक, मनसे, नगर.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maliwada center stop mns corporator vaccination ssh