महिलेस मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी अळकुटी येथील व्यापारी भागचंद साखला यांना पारनेर न्यायालयाने दोन महिन्यांची शिक्षा व दोन हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
या संदर्भातील अधिक माहिती पुढीलप्रमाणे मोलमजुरी करणाऱ्या गारखिंडी येथील इंदूबाई भिकु चौधरी यांनी मुलीच्या लग्नासाठी अळकुटी येथील व्यापारी भागचंद साखला यांच्याकडे १३ तोळे दागिने गहाण ठेऊन १३ हजार रूपायांचे कर्ज घेतले होत़े  काही कालावधीनंतर इंदूबाई यांनी व्याजासह रक्कम परत केल्यानंतर सोन्याची मागणी केली असता भागचंद यांनी ते परत करण्यास नकार दिला. त्यामुळे इंदुबाई यांनी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीचा राग भागचंद यांना होता.
दि. ८ जुलै २००७ रोजी आठवडे बाजारात भाजीपाला आणण्यासाठी इंदूबाई गेल्या असता भागचंद साखला यांनी बाजारात जाऊन त्यांना शिवीगाळ केली, केस धरून थोबाडीत मारली. अन्य लोकांनी त्यांना सोडवले. या प्रकाराचीही त्यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल करण्यात येऊन या खटल्याची पारनेच्या प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांपुढे सुनावणी झाली. केसाला धरून तोंडात मारल्याबददल आरोपीला १ महिन्याची शिक्षा व १ हजारांचा दंड तसेच विनयभंग केल्याबददल १ महिन्याची शिक्षा व १ हजारांचा दंड ठोठावला. फिर्यादी इंदूबाई चौधरी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील नाथ माधव शिंदे यांनी काम पाहिले.