भ्रष्टाचाराच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ‘आम आदमी’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर देशाच्या राजधानीत जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी विदर्भासह उपराजधानीत आम आदमीचे अस्तित्व कुठेही जाणवत नाही. त्यामुळे विदर्भातील कार्यकर्त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
लोकसभा आणि पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. देशाच्या राजधानीत आम आदमी पक्षाने कार्यकर्त्यांचे मोठे संघटन उभे केले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका वृत्त वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला चांगले यश मिळणार असल्याचे सूतोवाच केले आहे. दिल्लीमध्ये पक्षाचे काम वाढत असले तरी विदर्भात मात्र पक्षाचे अस्तित्व दिसून येत नाही. सामान्य माणसांचा आवाज म्हणून या पक्षाकडे बघितले जात होते. गेल्या वर्षभरात भ्रष्टाचार आणि अन्याय अत्याचारा विरोधात  निर्माण झालेल्या या पक्षाने ना कुठल्याही विषयावर ना आंदोलने केली, ना जनतेच्या समस्या सोडविण्याचे काम केले आहे. पक्षाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राचे प्रभारी मयंक गांधी यांनी विदर्भात संघटनात्मक काम वाढविण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले होते. नागपुरात कार्यकारिणी घोषित करण्यात आली होती मात्र त्या कार्यकारिणीतील पदाधिकारी कुठल्याही आंदोलनात सहभागी असल्याचे दिसून आले नाही.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन पुकारल्यानंतर विदर्भात त्यांच्या आंदोलनाला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. ज्यांना राजकारणात आवड आहे असे अनेक महाविद्यालयीन युवक -युवती त्यावेळी आम आदमी पक्षाशी जुळले गेले मात्र, गेल्या वर्षभरात तेही फारसे कुठल्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. पक्षाजवळ कार्यकर्त्यांची सशक्त फळी तयार नसल्याची कबुली केजरीवाल यांच्या निकटच्या काही कार्यकर्त्यांनी दिली.
पक्षाचे सदस्य राम आखरे म्हणाले, सामान्य माणसांच्या समस्यांसाठी आम आदमी या पक्षाची घोषणा करण्यात आली असून मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते या पक्षाशी जुळतील असा विश्वास होता मात्र गेल्या वर्षभरात संघटनात्मक काम झाले नाही. पक्षाची स्थापना झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते जुळले असताना त्यातील अनेक कार्यकर्ते आज दिसून येत नसल्याची खंत आखरे यांनी व्यक्त केली.
पक्षाचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी मात्र पक्षाचे काम वाढत असल्याचा दावा करून लवकरच विदर्भातील कार्यकर्त्यांच्या बैठकी आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. पक्षाचे प्रदेश प्रभारी सहा महिन्यांपूर्वी आले असताना त्यांनी भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्य़ाचा दौरा केला होता. नागपुरात कार्यकर्त्यांचे संघटन वाढविण्यासाठी विविध वार्डामध्ये कार्यकर्ते काम करीत असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question on aaps presence in vidarbha
First published on: 07-11-2013 at 08:32 IST