अपघातातही रेल्वे कर्मचाऱ्यांची सजगता

पहाटेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्थानक सोडल्यानंतर मंगला एक्स्प्रेसच्या उपहारगृहात प्रवाशांसाठी नाश्ता, चहा-कॉफी बनविण्याची लगबग सुरू होती.

पहाटेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्थानक सोडल्यानंतर मंगला एक्स्प्रेसच्या उपहारगृहात प्रवाशांसाठी नाश्ता, चहा-कॉफी बनविण्याची लगबग सुरू होती. स्वयंपाकगृहातील गॅस शेगडय़ांवर हे काम करण्यात कर्मचारी गर्क असताना काही जण नीटनेटके होण्याच्या तयारीत होते. सहाच्या सुमारास अचानक स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. अनेक डबे रुळावरुन घसरले. काही डबे शेजारच्या डब्यांवर आदळले. काय झाले ते आधी कोणाला समजले नाही. उपहारगृहाचा डबा पूर्णपणे आडवा-तिडवा झाला. जवळपास २० ते २२ कर्मचारी त्यात अडकले. या भयावह स्थितीत जखमी झालेल्या काही जणांनी प्रसंगावधान राखून स्वयंपाकगृहातील धगधगणाऱ्या गॅस शेगडय़ा प्रथम तातडीने बंद केल्या. त्यामुळे संभाव्य हानी रोखता आली.
नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या मार्गावर शुक्रवारी सकाळी घोटी येथे मंगला एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात काही जिवितहानी झाली तर कित्येक प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेला अनेक पदर आहेत. कित्येक प्रवासी सकाळच्या गाढ झोपेतच या घटनेस सामोरे गेले तर काही जागे होते. त्यांनी संकटसमयी प्रसंगावधान
राखले.
अपघाताची तीव्रता उपहारगृहातील धगधगणाऱ्या गॅस शेगडय़ांनी कित्येक पटींनी वाढविली असती अशी भीती व्यक्त करत तो प्रसंग ‘नाशिक वृत्तान्त’कडे मांडताना उपहारगृहातील जखमी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील भय स्पष्टपणे जाणवत होते. मंगला एक्स्प्रेसमध्ये दहाव्या डब्यानंतर उपहारगृहाचा (खानपान सेवा) डबा आहे. अपघातात या डब्यासह १२ व १३ क्रमांकाचा डबा पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला. पहाटेपासूनच या उपहारगृहात नियमित कामांची धावपळ सुरू होते. काही कर्मचारी नाश्त्याचे पदार्थ, चहा-कॉफी तयार करत होते तर काही जण हात-तोंड धुवून आवरण्याच्या तयारीत होते. तेव्हाच मोठा आवाज झाला आणि रेल्वेगाडीच्या मध्यभागातील डबे जणू भूकंप झाल्यासारखे हादरले. उपहारगृहाचा डबाही फेकला गेला. काही कर्मचारी स्वयंपाकगृहात अडकले तर काही डब्यातील अन्य भागात. एक कर्मचारी प्रसाधनगृहात अडकलेला. मुरलीधरन् (५५) हे गंभीर जखमी झाले. किरकोळ जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांनी वेळ न दवडता आधी स्वयंपाकगृहातील गॅस शेगडय़ा बंद केल्याची माहिती कर्मचारी अजितकुमार, अर्जुन व रामू यांनी दिली. मागील १९ वर्षांत या एक्स्प्रेसला भीषण अपघात झाल्याचे प्रथमच अनुभवल्याचे अजितकुमार यांनी सांगितले. गॅस शेगडय़ा बंद केल्या नसत्या तर उपहारगृहासह इतर डबे आगीच्या कचाटय़ात सापडले असते, अशी भीती या सर्वानी व्यक्त केली.
अपघातानंतर १० ते १५ मिनिटांत रेल्वे प्रशासन, पोलीस व स्थानिकांकडून मदतकार्य सुरू झाले. उपहारगृहात अडकलेल्यांनी एकमेकांना सावरून, प्रसाधनगृहात अडकलेल्याला सोडवून बाहेर पडण्याची धडपड केल्याचे संबंधितांनी सांगितले. गंभीर जखमी मुरलीधरनवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
‘इटारसी’लाच धोक्याची सूचना ?
घोटीआधीच मंगला एक्स्प्रेस धोकादायक स्थितीतून जात असल्याची जाणीव झाल्याची भावना उल्हासनगरचे प्रवासी पुरूषोत्तम बैरागी यांनी व्यक्त केली. इटारसीच्या आधी एस-११ डब्यातील ‘इलेक्ट्रिक पॅनल’ अचानक उघडले गेले होते. सर्व वीजतारा उघडय़ा पडल्यामुळे प्रवासी भयभीत झाले. काही जणांनी साखळी ओढून गाडी थांबविली. त्यामुळे इटारसी स्थानकावर रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी डब्यात येऊन पाहणी केली. त्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतरच मंगला एक्स्प्रेस पुढे मार्गस्थ झाली. झालेल्या प्रकारामुळे या डब्यातील बहुतेक प्रवासी जीव मुठीत धरून बसले होते. घोटी येथे जेव्हा रेल्वे अपघातग्रस्त झाली, तेव्हा डब्यातील वीज वाहिन्यांमधील दोषामुळे हा प्रकार घडला की काय, असे सर्वाना वाटल्याचे बैरागी यांनी सांगितले. बैरागी यांच्यासह त्यांची मुलगी माधुरी (२२) नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. डोक्याला मार लागल्याने माधुरी गंभीर जखमी झाली आहे. स्वत: जखमी असूनही बैरागी हे मुलीच्या उशाशी बसून एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या उपरोक्त प्रकाराची माहिती देत होते. डब्यातील उघडय़ा पडलेल्या वीज तारांचा दोष पूर्णपणे दूर केल्याशिवाय रेल्वेगाडी मार्गस्थ करू नये, असा आग्रह प्रवाशांनी इटारसी येथेच धरला होता. परंतु, रेल्वे अधिकाऱ्यांनी सर्व काही ठीकठाकचे आश्वासन देत वेळ मारुन नेली, असा आरोप बैरागी यांनी केला. अपघातानंतर माधुरी डब्याच्या बाहेर फेकली गेली होती. तीचे वडील १५ मिनिटे डब्यातच तीला शोधत होते. या अपघाताचे खापर बैरागी यांनी रेल्वे प्रशासनावर फोडले.
झोपेमुळे जखमींच्या संख्येत वाढ
सकाळची वेळ असल्याने बहुतेक प्रवासी झोपेतच होते. त्यामुळे जखमींची संख्या वाढल्याचे लक्षात येते. काय झाले ते कळलेच नाही, अशी बहुतेक प्रवाशांची प्रतिक्रिया. संजीवन के. (२७) हा लष्करी जवान अपघातात जखमी झाला. केरळमधील आपल्या गावी तो सुटीवर निघाला होता. त्याच्या समवेत आणखी तीन ते चार जवान होते. कसेबसे सावरून आपण डब्यातून बाहेर पडल्याचे संजीवन यांनी सांगितले. कामासाठी गोव्याला निघालेल्या एका तरुणाने अपघातानंतर डोळ्यासमोर अंधार दाटून आल्याचे नमूद केले. जखमींमध्ये कोणाचा हात मोडलेला तर कोणाचा पाय. कोणाच्या पाठीला मुका मार लागलेला. झोपेत असल्याने तत्काळ सावरणे अवघड गेल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Railway accidents

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी