शहरातील रेल्वे जंक्शन स्थानकात असलेल्या एकमेव पादचारी पुलाला समांतर असलेल्या पुलाच्या एका भागाला तडे गेल्यामुळे या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच दुरूस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर हाती घेतले आहे. रेल्वे स्थानकात होणारी गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त पादचारी पूल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु निधी अभावी हे काम रखडले.े सध्या एकाच पादचारी पुलावरून संपूर्ण रेल्वे स्थानकाची रहदारी सुरू आहे.
मनमाड रेल्वे स्थानकात एकमेव जुना पादचारी पूल आहे. या पुलाला समांतर असा पूल शेजारी असून फलाट क्रमांक तीन, चार, पाच आणि सहासाठी या पुलाला समांतर पायऱ्या आहेत. हा एकमेव पादचारी पूल जीर्ण झाला आहे. रेल्वे वेगाने गेल्यास या संपूर्ण पुलाला हादरे बसतात. गर्दीच्या वेळी देखील पूल हलत असल्यासारखे वाटते. सध्या या पादचारी पुलाला समांतर असलेल्या पुलालाही हादरे बसू लागले आहेत. स्थानकात पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाच्या ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांनी तातडीने या पुलावरची वाहतूक थांबवली.
सात डिसेंबर रोजी रेल्वे महाप्रबंधक मनमाड रेल्वे स्थानकाची वार्षिक तपासणी करणार आहेत.,
या पाश्र्वभूमीवर स्थानिक रेल्वे प्रशासनाने तातडीने सदर पुलाचे काम हाती घेतले. पुलावरील फरशा काढून टाकण्यात आल्या आहेत. तसेच स्लिपर बदलण्याचे काम सुरू आहे. पूल वाहतुकीसाठी यापुढे योग्य राहील का, याबबत तज्ज्ञ समिती पाहणी करणार आहे. मनमाड रेल्वे स्थानकात झालेल्या स्थानिक रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीतही पादचारी पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी का बंद केली, या मुद्यावर चर्चा झाली.