सामाजिक आशयसंपन्न चित्रपट देणारे अभ्यासू व संवेदनशील दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आशयघन चित्रपटांद्वारे आपली खास ओळख निर्माण करणाऱ्या या कलावंताच्या अकस्मात जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीची कधीही भरून न येणारी हानी झाल्याची भावना या क्षेत्रातून उमटली. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा वारसा समर्थपणे चालविण्याची क्षमता असणाऱ्या राजीव यांनी प्रत्येक चित्रपटात स्थानिक कलावंत अन् तंत्रज्ञांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या निधनाने स्थानिक नवोदित कलावंतांचा आधार निखळल्याचे प्रत्येकाच्या अश्रुंमधून अधोरेखीत झाले.
मुंबईत सोमवारी हृदयविकाराने राजीव पाटील (४१) यांचे निधन झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचे पार्थिव नाशिकला आणण्यात आले. सकाळी भुजबळ फार्म परिसरातील पाटील यांच्या निवास स्थानापासून पुष्पहारांनी सजविलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी राजीव यांची पत्नी सुवर्णा, कन्या इरा, आई आशाताई, भाऊ अजय व प्रशांत हे उपस्थित होते.
नाशिकच्या नाटय़ चळवळीचा केंद्रबिंदू असणाऱ्या महाकवी कालिदास कला मंदिराशी राजीव यांचा अतिशय निकटचा संबंध होता. त्यामुळे काही काळ त्यांचे पार्थिव या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. याप्रसंगी खा. समीर भुजबळ, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, वसंत गिते, नितीन भोसले, माणिक कोकाटे, जयंत जाधव या आमदारांसह अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे कार्याध्यक्ष दीपक करंजीकर, चित्रपट लेखक दत्ता पाटील, ‘मविप्र’च्या सरचिटणीस नीलिमा पवार, ‘सावाना’चे अध्यक्ष विलास औरंगाबादकर आदी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. सुरूवातीच्या काळात नाशिकच्या प्रयोग परिवाराच्या माध्यमातून राजीव यांनी नाटय़ चळवळीत काम केले. या परिवाराचे त्यांच्या समवेत काम करणारे बहुतेक सदस्य यावेळी उपस्थित होते. त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. राजीवच्या अचानक जाण्यांचा सर्वाना जबर मानसिक धक्का बसला. एकमेकांना कसेबसे सावरत ते अंत्ययात्रेत सहभागी झाले.
कालिदास कला मंदिरापासून अंत्ययात्रा पंचवटीतील अमरधामकडे मार्गस्थ झाली. मराठी चित्रपट निर्मितीला वेगळा आयाम देणाऱ्या राजीव यांच्या पार्थिवाला ठिकठिकाणी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. शेकडोंचा जनसमुदाय अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. अमरधाममध्ये प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल, मेघा घाडगे यांसह स्थानिक पातळीवरील नाटय़-चित्रपट, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मोठे बंधू अजय पाटील यांनी पार्थिवास अग्नीडाग दिला. यावेळी प्रत्येकाला अक्षरश: गहिवरून आले. श्रद्धांजली अर्पण करताना बहुतेकांनी राजीव यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीची कधीही भरुन न निघणारी हानी झाल्याची भावना व्यक्त केली. राजीव यांचे अकस्मात जाणे मनाला चटका लावणारे ठरले. नाशिकमध्ये चित्रपट नगरी निर्माण करण्याचा त्यांचा मानस होता. या विषयावर काही दिवसांपूर्वीच त्यांच्याशी चर्चा झाली होती. परंतु, त्या दृष्टीने पुढील काही प्रक्रिया होण्यापूर्वीच राजीव यांच्या अंत्यसंस्काराला यावे लागेल, अशी कल्पनाही केली नव्हती, असे आ. गिते यांनी नमूद केले. खा. भुजबळ यांनीही अनेक चांगले कलावंत घडविणाऱ्या व्यक्तीला आपण मुकलो असल्याचे सांगितले. राजीव यांनी प्रत्येक चित्रपटात स्थानिक  नवोदित कलावंत आणि तंत्रज्ञांना काम दिले. त्यांच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना मराठी चित्रपट सृष्टीचे व्यासपीठ उपलब्ध झाले. पाटील यांच्या निधनामुळे स्थानिक नाटय़-चित्रपट क्षेत्राची अपरिमित हानी झाल्याचे आ.बबन घोलप आणि आ. कोकाटे यांनी सांगितले. पंधरा वर्षांत मोठा पल्ला गाठणारा मित्र निघून गेल्याची भावना नाटय़ परिषदेचे करंजीकर यांनी व्यक्त केली. चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंचा वारसा राजीव यांनी समर्थपणे पुढे चालवला होता. त्यांनी अनेक समग्र चित्रपट घडविले. फाळके यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असताना पाटील यांचे निधन ही अतिशय दु:खदायक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही वर्षांपूर्वी ‘सावरखेडे एक गाव.’ पासून राजीव आणि आम्ही मराठी चित्रपट सृष्टीत सोबतच पर्दापण केले होते. राजीव यांच्या निधनामुळे मित्र म्हणून आमचे सर्वात मोठे नुकसान झाले. संगीत, दिग्दर्शन चित्रपटाशी संबंधित प्रत्येक घटकाची त्याला चांगली जाण होती. तशी व्यक्ती पुन्हा होणार नाही.
त्याच्या सहकार्यामुळे चित्रपटात अनेक नवीन मार्ग चोखाळता आले. त्याला एखादी संकल्पना सांगितली की, तो ‘ट्रेंड’ आणता येईल अशी राजीव खास व्यवस्था करायचा.
म्हणजे हक्काने सर्व काही त्याला सांगता यायचे. अजून असे काही नाविण्यपूर्ण
प्रवाह आणावयाचे होते. मात्र आता ते
अपूर्णच राहिले.
संगीतकार अजय-अतुल

More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajiv patil of jogwa fame passes away at
First published on: 02-10-2013 at 08:33 IST