विविध मागण्यांसाठी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चेकऱ्यांच्या सभेत रमेश देवरे यांनी काँग्रेसच्या धोरणावर जोरदार टीका केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चा अडविला. मोर्चेकऱ्यांसमोर पक्षाचे अंकुशराव बुंधवत, हरिभाऊ दुधाळकर यांच्यासह कॉम्रेड रमेश देवरे यांची भाषणे झाली. काँग्रेस पक्षाचे धोरण गरिबांच्या हिताचे नाही. अनेक नेते घोटाळय़ांत अडकले आहेत, असे सांगून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार आदी प्रश्नांवर या नेत्यांनी सरकारविरुद्ध जोरदार टीका केली.
मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांची घेऊन निवेदन दिले. जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीला आळा घालावा, २ रुपये किलो दराने प्रत्येक कुटुंबाला ३५ किलो धान्यपुरवठा करावा, धान्याऐवजी रोखीने रक्कम द्यावी, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावे, दलित, आदिवासी व महिलांवरील अत्याचार थांबवा, हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात घ्या, गायरानधारक व जमिनीचे पट्टे कसणाऱ्यांच्या नावे करा आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.