कर्जत शहरातील बेलेकर कॉलनी या उपनगरात सोमवारी मध्यरात्री चोरटय़ांनी धुमाकूळ घातला. काँग्रेसचे नेते अंबादास पिसाळ यांच्याही घराच्या कुलपाचा कोंडा तोडून चोरटय़ांनी येथेही चोरीचा प्रयत्न केला.
शहरात काल रात्री चोरटय़ांनी चांगलाच धुमाकूळ घातला. बेलेकर कॉलनीतील अतुल शिंदे यांच्या बंगल्याच्या गेटला आतून लावलेले कुलूप तोडून चोरटे स्वयंपाकघराच्या दरवाजाने आत शिरले. घरातील कपाटाच्या लॉकरमधून सुमारे ४९ हजार ५०० रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने चोरटय़ांनी पळवले. त्यानंतर शेजारीच लक्ष्मण अनारसे यांच्या घरातही असाच प्रवेश करून उचकापाचक केली व कॅमेरा चोरून नेला. त्यानंतर त्यांनी अन्य घरे उघडण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे नेते अंबादास पिसाळ यांच्या बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, मात्र त्यांच्या घरी चोरी केली नाही.
शिंदे यांच्या घरात माणसे असताना तीन, चार दरवाजे तोडून चोरटय़ांनी त्यांचे कसब दाखवले हे विशेष. चोरटय़ांच्या धुमाकुळाने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.