शहरातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीस शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षाचालकाने पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गेल्या शुक्रवारी (दि. २१) घडली. पोलिसांनी या रिक्षाचालकास अटक केली असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोठला येथील १४वर्षीय शाळकरी मुलगी भिंगार भागातील एका शाळेत शिकत होती. ती प्रतिक पांडुरंग आतकर (रा. आलमगीर, भिंगार) याच्या रिक्षात रोज ये-जा करत होती. ही मुलगी कोठला मैदानातील मेडिकल दुकानातून जात असताना आतकर याने तिला फूस लावून व लग्नाचे आमीष दाखवून मोटारसायकलवरून पळवून नेले. तसेच बरोबर आली नाही तर वडील व भावाला जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली. त्याने प्रथम तिला विळद रेल्वेस्थानकावरून श्रीरामपूर व नंतर तवेरा गाडीने बारामती येथे पळवून नेले व तेथे पाटस रस्ता परिसरात राहणाऱ्या त्याच्या ओळखीच्या चव्हाण याच्या घरी दोन-तीन दिवस राहून तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान, याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली होती. पोलिसांनी तपास करून आरोपी आतकर यास अटक केली असून त्याच्याविरूद्ध बलात्काराच्या गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लष्कर करीत आहेत.
दिल्लीचे सामूहिक बलात्कार प्रकरण देशभर गाजत असताना नगरमध्येही माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य घडल्याने संताप व्यक्त होत आहे.