हिमायतनगर तालुक्यातील खडकी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी ३ आरोपींची १० दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. आरोपींना बुधवारी भोकर न्यायालयासमोर हजर केले होते. बलात्कार प्रकरणातील सहआरोपी चंद्रमा रिसोर्ट ढाब्याचा मालक अशोक गणपतराव मारकवार यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना नांदेडला उपचारार्थ हलवले. सूत्रधार सुनील सांबाळकरसह अन्य एक मात्र फरारी आहे.
खडकी येथील सहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या या १४वर्षीय मुलीला मित्र राजू रायते (भोकर) याने बोलविले होते. ही मुलगी त्याला भेटण्यास नंदीग्राम एक्स्प्रेसने भोकर येथे आली. परंतु मित्र न भेटल्याने शहरातील मुख्य चौकातून गावाकडे परत जाण्यासाठी निघाली असता या मुलीवर बडतर्फ पोलीस कर्मचारी सुनील सांबाळकर या नराधमाची नजर गेली. तुला गावी सोडतो, अशी बतावणी करीत एका ऑटोमधून सायंकाळी भोकरपासून ५ किलोमीटर अंतरावरील चंद्रमा रिसॉर्ट ढाब्यावर नेले व तेथे एका खोलीत बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्याचे साथीदार संदीप बाबुराव हामंद (वय २८) व राजू शिवाजी खांडरे (वय २१, धानोरा, तालुका भोकर) यांना बोलावून गोविंद हामंद (धानोरा) यांच्या शेतात मॅजिक गाडीतून (एमएच २६ ए ०६२८) नेऊन या दोघांनी बलात्कार केला व मुलीस भोकरच्या मुख्य चौकात सोडून पळाले. नंतर अत्याचारग्रस्त मुलीवर माजिद खाँ राजे खाँ (वय २८, गाडीचालक, रशिद टेकडी, भोकर) याची नजर पडली. त्यानेही मुलीस शनिमंदिर परिसरातील शेतात नेऊन बलात्कार केला. ही मुलगी रडत बसल्यानंतर काहींनी तिला भोकर पोलीस ठाण्यात आणले. तेथे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अमोल झेंडे पाटील, निरीक्षक पंडित मुंडे यांना तिने हकीकत सांगितली. त्यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून संदीप हामंद, राजू खांडरे, माजिद खाँ, अशोक मारकवार यांना ताब्यात घेतले. सूत्रधार सांबाळकर व गोविंद हामंद फरारी झाले. अत्याचारग्रस्त मुलीच्या तक्रारीवरून वरील सहाजणांविरुद्ध अपहार, अ‍ॅट्रॉसिटी व सामूहिक बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करून वरील तीन आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता १० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश श्रीनाथ फड यांनी दिले.विशेष म्हणजे भोकर येथील अभिवक्ता  संघाने आरोपींचे आरोपपत्र न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याने न्यायाधीशांनी सरकारतर्फे वकील देत आरोपींची बाजू   मांडण्याची संधी दिली. सांबाळकरच्या  छळाला कंटाळून पोलीस    कर्मचारी  महिलेने २००८मध्ये आत्महत्या केली होती. त्याच प्रकरणात त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले.