धोंडेगावमध्ये चार लाख लिटरपेक्षा अधिक पाण्याचे संवर्धन
पर्यावरण स्नेही
पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे सध्या धरणातील पाणी वाटपावरून जिल्ह्या-जिल्ह्यात एका नव्या वादाला तोंड फुटले असले तरी जेव्हा कमी का असेना पाऊस कोसळतो, तेव्हा ते पाणी अडविणे अथवा जमिनीत जिरविणे या दृष्टीकोनातून फारसे प्रयत्नच होत नसल्याचे दिसून येते. परिणामी, तात्पुरती निकट भागविण्यासाठी प्रसंगी कंठशोष करून काम भागविण्यास प्राधान्य दिले जात असल्याने मूळ प्रश्न कायम राहतो. या पाश्र्वभूमीवर, नाशिकच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी जिल्ह्यातील धोंडेगावमध्ये श्रमसंस्कार शिबीराच्या माध्यमातून चार लाख लिटरपेक्षा अधिक पाण्याच्या संवर्धनाद्वारे टंचाईचा मूळ प्रश्न सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे अधोरेखीत झाले आहे.
युवा शक्तीला योग्य दिशा दिल्यास ते किती भरीव स्वरूपाचे कार्य करू शकतात त्याचे उदाहरण म्हणून या अभिनव प्रकल्पाकडे पाहता येईल. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने एक विशिष्ट धैर्य डोळ्यासमोर ठेऊन सहा वर्षांपूर्वी हाती घेतलेला हा उपक्रम आज प्रत्यक्षात आला आहे. त्यात ‘रासेयो’च्या स्वयंसेवकांचे जसे भरीव योगदान आहे, तसेच या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही. रासेयोच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरासाठी आदिवासीबहुल धोंडेगावची निवड करण्यात आली. सलग सहा वर्ष या गावातच शिबिराचे सातत्याने आयोजन केल्यामुळे पाणलोट क्षेत्र विकासाचे अभिनव काम झाल्याचे दिसत आहे. कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार स्वयंसेवकांनी गाव परिसरात थोडे थोडके नव्हे तर तब्बल २७०० मीटर लांबीचे समतल चर खोदण्याचे काम केले. त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी टिकाव व फावडेही कधी हाती धरले नव्हते. त्यामुळे चर खोदताना अनेकांच्या हाताला अक्षरश: फोड आले. परंतु, त्यांनी जिद्दीने हे काम पूर्णत्वास
नेले. त्यामुळे याद्वारे चार लाख लिटरपेक्षा अधिक पाण्याचे संवर्धन केले जात आहे.
या उपक्रमाची संकल्पना कार्यक्रम अधिकारी प्रा. अशोक सोनवणे यांची. स्वयंसेवकांबरोबर त्यांनी स्वत:ला या कामात झोकून दिले. पाणलोट क्षेत्र विकासाचे काम करून स्वयंसेवक थांबले नाहीत तर वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे त्यांनी धोंडेगावला वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामस्थांना सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. निर्मलग्राम साकार होण्यासाठी शौचालयांचे शोषखड्डे स्वयंसेवकांनी खोदून दिले. परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठीही धडपड करण्यात आली. मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांवर श्रम व सामाजिक सहजीवनाचे संस्कार रुजविण्याचे काम केले जाते. स्वयंसेवकांनी स्वत: होऊन स्वयंशिस्त अंगी बाणविण्याचा निश्चित केला. या शिबिराच्या माध्यमातून चार भिंतीच्या बाहेरील दिले जाणारे शिक्षण अतिशय महत्वाचे असल्याची जाणीव स्वयंसेवकांना या निमित्ताने झाली.
रासेयोच्या माध्यमातून झालेल्या या अभिनव कामाची शिबिरास भेट देणाऱ्या प्रत्येक मान्यवराने प्रशंसा केली. मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सुसंस्काराचे महत्व मांडले. हे सुसंस्कार राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे होऊ शकतात. रासेयो रचनात्मक कार्य उभे करू शकते. धोंडेगावमध्ये स्वयंसेवकांनी केलेले हे काम इतरांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनीही मार्गदर्शन केले. पावसाअभावी उन्हाळ्यात ग्रामीण भागात काय स्थिती निर्माण होईल, याबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना धोंडेगावमध्ये साकारलेला पाणलोट क्षेत्र विकासाचा प्रकल्प आगामी काळात इतरांना निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल.